Spread the love

– स्थलांतरीत नागरिकांना अन्न, पाणी, ब्लँकेटचे वाटप
– आता परिसरात जंतुनाशक फवारणीची मागणी

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मागील तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. त्यामुळे पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. पूराचा धोका वाढल्याने अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले. रहाटणी येथील महापालिका शाळा क्रमांक ५५ आणि पिंपळे सौदागरमधील महापालिका शाळा क्रमांक ५१ येथे पूरग्रस्तांची राहण्याची व्यवस्था केली. तेथे नागरिकांना उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने राहण्यासह जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

संकटकाळात उन्नती सोशल फाउंडेशन तातडीने मदतीचा हात पुढे करत आले आहे. फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना नाश्ता, पिण्याचे स्वच्छ पाणी, ब्लँकेट, बिस्किटे तसेच जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे आणि संस्थापक संजय (आबा) भिसे यांनी मदत केंद्रांना भेट देऊन पूरग्रस्त नागरिकांची विचारपूस केली. त्यांच्या अडचणी जाणून घेत प्रशासनाच्या मदतकार्यातही सहकार्य केले. फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी दिवसभर मदतकार्य करून नागरिकांना दिलासा दिला.

मुसळधार पाऊस झाल्याने पिंपळे सौदागरच्या अनेक भागात पाणी शिरले. ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे घाण पाणी रस्त्यावरुन वाहू लागले. परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस कमी झाल्यानंतर मच्छरांचा त्रास होऊन संभाव्य साथरोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यास नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. नागरिकांवर ही वेळ येऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने परिसरात कीटक नाशक व जंतूनाशक औषध फवारणी करावी, अशी मागणी डॉ. कुंदा भिसे यांनी केली आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात एकमेकांच्या मदतीला धावून जाणे हीच खरी माणुसकी आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि ड्रेनेजची कामे योग्य पद्धतीने झाली असती, तर आज अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली नसती. सध्या आमचा भर पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत, मानसिक आधार आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर आहे.

– डॉ. कुंदा संजय भिसे, नगरसेविका तथा अध्यक्षा, उन्नती सोशल फाउंडेशन

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version