पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीला पूर आला असून रहाटणी परिसरातील अनेक भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. रहाटणी गावठाण, पवनानगर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर, भैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर आणि गंगानगर येथील नागरिकांना पुराचा फटका बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि प्रशासनाच्या मदतीने पूरग्रस्त नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. नागरिकांची तात्पुरती व्यवस्था रहाटणी येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ५५ मध्ये करण्यात आली.
या बचाव व मदतकार्यात नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांनी घटनास्थळी उपस्थित राहून प्रशासनाशी समन्वय साधत नागरिकांना आवश्यक सहकार्य केले. “प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च जबाबदारी असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत,” असे त्यांनी सांगितले.
पूरग्रस्त भागात प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत.
