Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टी, पूरस्थिती तसेच विविध आपत्कालीन घटनांना तोंड देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चोवीस तास आपत्कालीन सेवा उपलब्ध ठेवण्यात आली आहे.

पावसाळ्यात अतिवृष्टी, पूरस्थिती, पाणी साचणे, झाडे कोसळणे, संरक्षण भिंती अथवा इमारतींचे काही भाग कोसळणे, वाहन अडकणे, नागरिक अडकणे तसेच इतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी तात्काळ मदत व बचावकार्य करण्यासाठी सर्व अग्निशमन केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे.

सदर कालावधीत अग्निशमन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व अग्निशमन केंद्रांवर अग्निशमन वाहने, रेस्क्यू व्हॅन, मोटर पंप, डी-वॉटरिंग पंप, लाईफ जॅकेट, लाईफ बॉय, दोरखंड, स्ट्रेचर, चेनसॉ, फ्लड लाईट, उपलब्धतेनुसार बोटी तसेच इतर आवश्यक बचाव साहित्य तत्परतेने वापरण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.

शहरातील पूरप्रवण भाग, नदी-नाले, ओढे, कमी उंचीचे पूल, भुयारी मार्ग तसेच पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व अग्निशमन केंद्रांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय पोलीस विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभाग, महावितरण, जलनिस्सारण विभाग तसेच इतर संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून बचावकार्य प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन

– मुसळधार पावसाच्या वेळी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे.
– पाणी भरलेल्या रस्ते, पूल किंवा भुयारी मार्गातून जाण्याचा प्रयत्न करू नये.
– वादळी वाऱ्याच्या वेळी मोठी झाडे, जीर्ण इमारती किंवा होर्डिंगजवळ थांबू नये.
– तुटलेल्या किंवा पाण्यात पडलेल्या विद्युत तारांपासून सुरक्षित अंतर राखून संबंधित विभागाला तात्काळ माहिती द्यावी.
– कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास अग्निशमन विभागाच्या आपत्कालीन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग नागरिकांच्या सेवेसाठी चोवीस तास कार्यरत असून, नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित अग्निशमन विभागाच्या “१०१” या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे.

“पावसाळ्याच्या काळात नागरिकांची सुरक्षितता ही महापालिकेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन विभागासह सर्व संबंधित यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.”

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

“अतिवृष्टी किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाकडून तातडीने मदत व बचावकार्य केले जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास तत्काळ अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा. प्रशासन आणि नागरिक यांच्या सहकार्यामुळे आपत्तीचा परिणाम प्रभावीपणे कमी करता येईल.”

-व्यंकटेश दुर्वास, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version