Spread the love

मराठी भाषा ज्ञानभाषा बनण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल.

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी भाषेचे संवर्धन, मराठीला उच्च शिक्षणात अधिक सन्मानाचे स्थान आणि मातृभाषेतून तांत्रिक शिक्षणाचा विस्तार या दृष्टीने महाराष्ट्रात सुरू झालेल्या मराठी माध्यमातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची विधान परिषदेत आमदार अमित गोरखे यांनी विशेष दखल घेतली.

पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (PCCOE) यांनी मराठीत अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू करून राज्याच्या शैक्षणिक इतिहासात नवा अध्याय लिहिला असल्याचे सांगत संस्थेचे त्यांनी सभागृहात विशेष अभिनंदन केले.

विधान परिषदेत मराठी भाषा संवर्धनासंदर्भातील चर्चेदरम्यान आमदार अमित गोरखे यांनी मराठी ही केवळ व्यवहाराची भाषा न राहता ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम व्हावी, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीसारख्या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मराठीचा वापर वाढावा, यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने महाराष्ट्रात मराठी माध्यमातून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू करून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे नमूद केले. मराठीत अभियांत्रिकी शिक्षणाची ही ऐतिहासिक सुरुवात राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड हे राज्यातील औद्योगिक, तांत्रिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. अशा शहरातील शैक्षणिक संस्थेने मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षणाचा अभिनव उपक्रम राबविल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या शैक्षणिक लौकिकात आणखी भर पडल्याचे आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात अधोरेखित केले.

या चर्चेला उत्तर देताना उद्योग व मराठी भाषा मंत्री मा.ना.उदय सामंत यांनी मराठी भाषेतून तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबाबत शासनाची सकारात्मक भूमिका मांडली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण मातृभाषेत उपलब्ध व्हावे, यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करत असल्याची माहिती आमदार अमित गोरखे यांनी सभागृहाला दिली.

यावेळी आमदार अमित गोरखे यांनी मराठी भाषेला उच्च शिक्षणात अधिक व्यापक स्थान मिळावे, मराठीतून व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाचे नवे मार्ग खुले व्हावेत आणि महाराष्ट्रातील इतर शैक्षणिक संस्थांनीही अशा उपक्रमांचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, मराठीला ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम करण्यासाठी आणि तांत्रिक शिक्षणात मातृभाषेचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने केलेला हा ऐतिहासिक उपक्रम राज्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत आमदार अमित गोरखे यांनी संस्थेचे पुन्हा एकदा विशेष अभिनंदन केले..

वरती केलेली प्रेस नोट आणि व्हिडिओ हा आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेमध्ये मांडलेला मराठी भाषेच्या संवर्धनाविषयीचा तसेच पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अभिनंदन संदर्भातील महत्त्वाचा मुद्दा आहे त्याला मंत्री उदय सामंत यांनी दिलेले उत्तर देखील त्यात समाविष्ट केलेले आहे..

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version