Spread the love

विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी महापालिका कटिबद्ध; महापौर रवि लांडगे यांचे प्रतिपादन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणाबरोबरच वाचन संस्कृती जोपासणे अत्यंत आवश्यक आहे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड आणि कौशल्य विकसित झाले तर त्यांची विचारशक्ती अधिक सक्षम होईल तसेच येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी महापालिका विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील ‘श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळा’ या नवीन, सुसज्ज व अत्याधुनिक शाळा इमारतीचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर,शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर,नगरसदस्य जितेंद्र ननावरे, नगरसदस्या मनिषा लांडे,वर्षा जगताप,प्रतीक्षा जवळकर,रिटा सानप,श्रुती वाकडकर,माजी नगरसदस्य शाम लांडे, माऊली थोरात,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रकाश जवळकर,राजेंद्र शेळके,रतन लांडगे,अशोक पगारे,रमेश लांडगे,ॲड.संजय गोडसे,भगवान धावटे,डाॅ.महेश शेटे,शरद औटे आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही इमारत उभारण्यात आली .

“अक्षर विश्व” ही संकल्पना महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेत प्रभावीपणे राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांमध्ये विषयाविषयी गोडी निर्माण करण्यासाठी आणि शिक्षण अधिक परिणामकारक करण्यासाठी ‘वारे गुरुजी पॅटर्न’ देखील महापालिकेच्या शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धतीच्या माध्यमातून महापालिकेच्या शाळा शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करतील असे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.

यावेळी महापौरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांनी ‘श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळा’ या नवीन इमारतीची पाहणी करून वर्गखोल्या, प्रयोगशाळा, सभागृहे आणि इतर सुविधांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी उपलब्ध सुविधांचा योग्य उपयोग करून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचे आवाहन केले.

नवीन पाच मजली शाळा इमारतीत एकूण २४ प्रशस्त वर्गखोल्या असून सुमारे ९६० विद्यार्थी येथे शिक्षण घेणार आहेत. विद्यार्थ्यांना आधुनिक व प्रयोगाधारित शिक्षण मिळावे यासाठी संगणक कक्ष, रसायनशास्त्र प्रयोगशाळा, गणित प्रयोगशाळेसह एकूण पाच अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत.

याशिवाय नृत्य, कला, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी चार स्वतंत्र सभागृहे तयार करण्यात आली आहे. शाळेच्या प्रशासकीय कामकाजासाठी चार स्वतंत्र कार्यालयांची व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांना सुरक्षित, आधुनिक आणि सर्व सुविधा असलेले शैक्षणिक वातावरण या इमारतीत उपलब्ध होणार आहे.

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानाधारित आणि सर्वसमावेशक शिक्षण देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘श्री छत्रपती शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळा’ या नवीन इमारतीमुळे कासारवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधांसह शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाला निश्चितच मोठी चालना मिळणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र ननावरे यांनी, तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले आणि आभार मनिषा लांडे यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version