पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांगवी येथील सरकार सेतू पुलावरील रोषणाई व सुशोभीकरण कामाच्या खर्चावरून प्रश्न उपस्थित झाले आहेत. या कामातील संभाव्य आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
स्थापत्य प्रकल्प विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुलाच्या रोषणाई व सुशोभीकरण कामात मोठ्या प्रमाणात एम.एस. साहित्य वापरल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष कामातील साहित्याचे वजन व खर्च याबाबत तफावत असल्याचा दावा करत भोईर यांनी स्वतंत्र तांत्रिक समितीमार्फत प्रत्यक्ष मोजमाप व साहित्य पडताळणी करण्याची मागणी केली आहे.
या कामासाठी सुमारे २२ कोटी रुपये खर्च झाल्याचे दर्शविण्यात आले असून, प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपानुसार खर्चाबाबत शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे कामाचे अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका (MB), बिले, देयके व मंजुरी आदेशांची तपासणी तसेच स्वतंत्र आर्थिक लेखापरीक्षण (Audit) करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सार्वजनिक निधीशी संबंधित हे प्रकरण गंभीर असल्याने तातडीने चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.
