चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केशवनगर, चिंचवड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संत गाडगेबाबा शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त हिंदू साम्राज्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जगन्नाथ देवीकर, पंजाबराव मोंढे, संघ स्वयंसेवक मधुकर बच्चे आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी जगन्नाथ देवीकर यांनी शिवचरित्रावर आधारित प्रेरणादायी व्याख्यान सादर केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमधून शिस्त, धैर्य, चारित्र्य, ज्ञान आणि राष्ट्रनिष्ठा हे गुण आत्मसात करण्याचे आवाहन केले.
“छत्रपती शिवरायांनी शस्त्रासोबतच शास्त्रालाही महत्त्व दिले. त्यांच्या आदर्शांवर चालून प्रत्येक नागरिकाने राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाला संघ स्वयंसेवक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी जय शिवाजी” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
