शब्दवैभव काव्यसंमेलनात त्रैभाषिक संगम
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या राज्याभिषेकामुळे निर्माण झालेला बनारस (काशी) – महाराष्ट्र हा ऐतिहासिक अनुबंध शब्दवैभव काव्यसंमेलनाने अधिकच दृढ झाला आहे!’ असे विचार बनारस येथील ज्येष्ठ हिंदी लेखिका कुमकुम सिंह यांनी शिवयोगी भवन, भगत वस्ती, इंद्रायणीनगर, भोसरी येथे (गुरुवार, दिनांक २५ जून) व्यक्त केले.
पिंपरी – चिंचवड साहित्य मंच आणि संत साई स्कूल, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शब्दवैभव’ या मराठी, हिंदी आणि उर्दू त्रैभाषिक काव्यसंमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुमकुम सिंह बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ उद्योजक भगवान पठारे, सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा रवी लांडगे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, प्रा. संजय पवार, संत साई स्कूलचे संस्थापक शिवलिंग ढवळेश्वर आणि पिंपरी – चिंचवड साहित्य मंचाचे अध्यक्ष राजेंद्र घावटे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
शब्दवैभव काव्यसंमेलनात प्रा. तुकाराम पाटील (मी एक सामान्य माणूस), राज अहेरराव (उर्दू हझल), प्रा. संजय पवार (वक्त के गुलाम), राजेंद्र घावटे (बाप), चंद्रकांत धस (मराठी गझल), रामदास पुजारी (आठवणीतील बालपण), सविता इंगळे (तू राम झालास का?), माधुरी विधाटे (शारदास्तवन), प्रदीप गांधलीकर (अभंग), सुनंदा शिंगनाथ (आई), जितेंद्र राय (कहाँ जा रहे हम?), सीमा गांधी (ती), सुभाष चव्हाण (भटकंती) आणि संत साई स्कूलमधील विद्यार्थिनींनी स्वरचित वैविध्यपूर्ण आकृतिबंधातील आशयघन कवितांचे प्रभावी सादरीकरण करीत त्रैभाषिक संगम साधला.
कुमकुम सिंह पुढे म्हणाल्या की, ‘साहित्य हा समाजमनाचा आरसा आहे. साहित्यिकांनी समाजातील विदारक वास्तवाचे अवलोकन करून त्यावर आपल्या साहित्यातून व्यक्त व्हावे; कारण असे साहित्य समाजासाठी दिशादर्शक ठरते!’
कार्यक्रमादरम्यान प्रा. संजय पवार लिखित ‘मुस्कुराते पत्ते’ आणि ‘यह सडक’ या दोन हिंदी काव्यसंग्रहांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. शिवलिंग ढवळेश्वर यांनी प्रास्ताविकातून, ‘विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळत असलेतरी त्यांच्यातील वाढती हिंसकवृत्ती ही चिंतेची बाब आहे. त्यामुळेच विविध साहित्यविषयक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा मानस आहे!’ अशी माहिती दिली. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संजय पवार यांनी आभार मानले.
