तळेगाव-चाकण-शिक्रापूर व देहू-येलवाडी रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाला युद्धपातळीवर कारवाईचे निर्देश देण्याची मागणी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ विधानसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचे आणि प्रलंबित असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर तसेच देहू-येलवाडी रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा आमदार सुनील शेळके यांनी बुधवारी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे प्रभावीपणे मांडला. या विषयावर बोलताना आमदार शेळके यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांच्या आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही संबंधित अधिकाऱ्यांची उदासीनता, चुकीचे नियोजन आणि ठेकेदारांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे काम अद्याप अपूर्ण असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून रोज हजारो वाहनचालक, कामगार, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी देहू-येलवाडी रस्त्याचाही प्रश्न लावून धरला. येत्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी देहूनगरीत दाखल होणार असताना या रस्त्याच्या कामासाठी ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. डिसेंबर २०२५ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आल्यानंतरही ठेकेदाराने काम सुरू केले नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वारी तोंडावर आलेली असताना प्रशासनाने साधी डागडुजी किंवा खड्डे बुजविण्याचे कामही केले नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून वारकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. लाखो भाविकांची श्रद्धा आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता दोन्ही रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू करावीत, अशी आग्रही मागणी आमदार शेळके यांनी केली.
मावळ तालुक्याच्या विकासाशी थेट संबंधित असलेला हा विषय विधानसभेत ठामपणे मांडत आमदार सुनील शेळके यांनी मतदारसंघातील मूलभूत प्रश्नांबाबत असलेली आपली संवेदनशीलता आणि विकासकामांवरील बारकाईने लक्ष पुन्हा अधोरेखित केले. आषाढी वारीपूर्वी हा प्रश्न मार्गी लागल्यास लाखो वारकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
