पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव वाचताना मराठीतील अनेक शब्दांचे चुकीचे उच्चार केल्याच्या घटनेवर कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या सर्वोच्च लोकशाही संस्थेत मराठी भाषेचा असा अवमान होणे ही अत्यंत गंभीर बाब असून यामुळे राज्यातील मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काशिनाथ नखाते म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद हे एक महत्त्वाचे घटनात्मक पद आहे. या पदावर असलेल्या व्यक्तीकडून मराठी भाषेचे शुद्ध उच्चार, भाषेचा सन्मान आणि भाषिक जाण अपेक्षित असते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असताना विधानसभेच्या सभागृहातच मराठी शब्दांचे वारंवार चुकीचे उच्चार होणे हे दुर्दैवी आहे. ही बाब केवळ वैयक्तिक चुकीपुरती मर्यादित नसून महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेशी संबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून संत साहित्य, समाजसुधारकांची परंपरा आणि विचारांचा वारसा जपणारी भाषा आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १०५ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानातून या भाषेला आणि महाराष्ट्राला स्वतंत्र ओळख मिळाली आहे. त्यामुळे मराठी भाषेचा सन्मान राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची नैतिक आणि सार्वजनिक जबाबदारी आहे. विधानसभा अध्यक्षाला अशा पद्धतीने मराठीत वाचून बोलावे लागते त्याचबरोबर भाषेची मोडतोड केली जाते हे दुर्दैवी आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज्यातील सर्वच घटनात्मक आणि शासकीय संस्थांनी मराठीच्या वापराबाबत अधिक जागरूक राहणे आवश्यक असल्याचे नखाते यांनी सांगितले.
मराठी भाषेच्या शुद्ध वापरासाठी आणि भाषिक सन्मान जपण्यासाठी राज्य सरकारने लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांसाठी आवश्यक भाषिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची व्यवस्था करावी, अशी मागणीही काशिनाथ नखाते यावेळी केली.
