Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि योग विद्या धाम, निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष योगाभ्यास कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून योगाभ्यास केला.

कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे आणि अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमास नगरसेविका अनुराधा गोरखे,उपआयुक्त पंकज पाटील,क्रीडा अधिकारी दिपक कन्हेरे,प्रशासन अधिकारी दत्तात्रय सूर्यवंशी,योग विद्या धाम, निगडीचे प्रमुख प्रमोद निफाडकर, योगिनीज योगा क्लासेसच्या संचालिका योगिता तरडे तसेच छत्रपती पुरस्कार विजेत्या शीतल मारणे उपस्थित होते. त्यानंतर ओंकार उच्चारण व प्रार्थनेद्वारे योग सत्राला प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात योगाचे महत्त्व, निरोगी जीवनासाठी योगाची आवश्यकता तसेच शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य जपण्यात योगाचे योगदान याविषयी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

यावेळी योगाचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी आणि भारतीय संस्कृतीतील या अमूल्य परंपरेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांचेही यावेळी स्मरण करण्यात आले.
योग विद्या धामच्या वतीने विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. उपस्थित मान्यवर तसेच नागरिकांनीही योगाभ्यासात सक्रिय सहभाग घेतला. नियमित योगाभ्यासामुळे निरोगी आणि संतुलित जीवनशैली घडण्यास मदत होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

योग हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा असून निरोगी जीवनाचा भक्कम पाया आहे. प्रत्येक नागरिकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहन कैलास कुटे यांनी यावेळी केले.

तर “योग” ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि बुद्धी यांचा समतोल साधणारी जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी समाज घडविण्यास हातभार लावावा असे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version