पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अधिक मासाचे औचित्य साधून तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ, रावेत तसेच ओम साई ग्रुप, निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘कृष्णायन’ या तीन दिवसीय भागवत कथाकथनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ, रावेत येथे दिनांक ११ ते १३ जून या कालावधीत संपन्न झालेल्या ‘कृष्णायन’ या कृष्ण कथेला श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. पंढरपूर येथील रहिवासी प्रवचनकार विनया कुलकर्णी – उत्पात यांनी श्रीमद् भागवत कथेतील दहाव्या स्कंधातील कथेत यशोदा मातेच्या घरी बालपण, माती खाणे, उखळाला बांधले जाणे, गोपींच्या घरी माखनचोरी करणे पूतना, बकासूर, तृणावर्त अशा राक्षसांचा वध, कालियामर्दन, रासलीला, गोपीप्रेम, यांद्वारे भक्तीचा सर्वोच्च मार्ग दाखवला. तसेच मथुरागमन, कंसवध, द्वारकालीला, जरासंधाशी युद्ध, रुक्मिणीहरण (विवाह), सुदाम्याचे आख्यान, द्वारकेची स्थापना आणि अंती अवतार समाप्ती इथवर साऱ्या संगीतमय कथा रसाळपणे सादर केल्या.
यावेळी वैभव केंगार यांनी संवादिनीवादन आणि गायनसाथ केली तर ओंकार कुलकर्णी यांनी तबलावादनाची उत्तम साथ दिली. याप्रसंगी शिरीष कुंभार आणि शीला कुंभार यांचा विठ्ठल – रुक्मिणी वेषात विवाह लावण्यात आला. या उपक्रमादरम्यान नवयुगचे संचालक संपतराव शिंदे यांना पंचाहत्तरी निमित्त तसेच माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांना सामाजिक कार्यानिमित्त प्रा. तुकाराम पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल बडके, अनिकेत गुहे, राज अहेरराव, नेहा कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, उज्ज्वला केळकर, चिंतामणी कुलकर्णी, रजनी अहेरराव, आर. आर. शिंदे, नंदकिशोर बडगुजर, दिलीप क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.
