पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज नागरिकांना थेट पाहता यावे, यासाठी सुरू करण्यात आलेले ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आज सोमवारी (दि. 15) होणाऱ्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण केले जाणार नसल्याने सत्ताधारी भाजपच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
महापालिकेतील दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपने प्रशासनातील पारदर्शकता वाढविण्यासाठी सर्वसाधारण सभेचे कामकाज ऑनलाईन दाखविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तत्कालीन महापौरांनी आयुक्तांना सभा कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर सभागृहातील चर्चा, नगरसेवकांची भूमिका आणि विविध विषयांवरील मते नागरिकांना थेट पाहता येत होती.
या निर्णयामुळे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरसेवकांच्या समर्थकांना महापालिकेतील कामकाजाची माहिती मिळत होती. कोणता नगरसेवक कोणत्या विषयावर बोलतो, सभेत त्याचा सहभाग किती आहे, यावरही मतदारांचे लक्ष राहू लागले होते. काही नगरसेवकांनी सभेतील आपले भाषण आणि चर्चेचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत जनसंपर्कासाठी त्याचा वापर केला.
मात्र, थेट प्रक्षेपणामुळे काही वेळा सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक अडचणीत आल्याचे चित्र निर्माण झाले. सभेतील वक्तव्ये, चर्चेतील मुद्दे आणि काही प्रसंग सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. त्यामुळे लाईव्ह प्रक्षेपणाचा निर्णय सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीचा ठरत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली.
अर्थसंकल्प सादरीकरणासारख्या महत्त्वाच्या सभांचे प्रक्षेपण करण्यात आले होते. मात्र, नियमित मासिक सर्वसाधारण सभांचे लाईव्ह प्रक्षेपण पुढे केले जाणार नसल्याचे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी स्पष्ट केले.
नागरिकांना महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेशी जोडण्यासाठी सुरू करण्यात आलेली सुविधा बंद झाल्याने विरोधकांकडूनही यावर टीका होण्याची शक्यता आहे. पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय राजकीय चर्चेचा विषय ठरणार आहे.
