ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद; पिंपळे सौदागरमध्ये स्वतंत्र विरंगुळा केंद्राची मागणी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांसोबत नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी संवाद साधत त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीदरम्यान ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विरंगुळा केंद्र सुरू करण्याची मागणी केली. तसेच परिसरातील नागरी सुविधा, सार्वजनिक समस्या आणि ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी याबाबतही त्यांनी आपली मते मांडली.
ज्येष्ठ नागरिकांच्या भावना व गरजा लक्षात घेऊन नगरसेविका अनिता काटे यांनी सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
“ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, त्यांच्या अनुभवांचा आदर आणि त्यांच्या सुविधांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे ही आमची बांधिलकी आहे,” असे यावेळी अनिता काटे यांनी सांगितले.
बैठकीला उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी नगरसेविका अनिता संदीप काटे यांच्या संवेदनशील, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
