पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीने आयोजित विभागीय आढावा बैठकीत आगामी संघटनात्मक उपक्रम, जनसंपर्क मोहिमा आणि केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा व्यापक प्रचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण रणनीती निश्चित करण्यात आली. पिंपरी-चिंचवड, पुणे उत्तर आणि मावळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व विभाग समन्वयक निरंजन डावखरे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, विभाग सहसंयोजक विक्रम देशमुख, अभियान प्रदेश सहसंयोजक विक्रम पाचपुते आणि जिल्हा प्रभारी भरत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि पुणे उत्तर (मावळ) जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी बैठकीचे स्वागत केले.
राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘मोदी सरकारची यशस्वी वर्षे : विश्वास, विकास आणि जनकल्याण’ या अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या चार महत्त्वाच्या कार्यक्रमांची रूपरेषा बैठकीत निश्चित करण्यात आली.
यामध्ये ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त शहरात एकाच दिवशी किमान १५ हजार वृक्ष लागवड करण्याचे तसेच संपूर्ण आठवडाभरात एक लाखाहून अधिक वृक्षांचे रोपण आणि संवर्धन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध योग संस्था, पतंजली परिवार आणि नागरिकांच्या सहभागातून शहरभर मोठ्या प्रमाणावर योग कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
तसेच २५ जून रोजी आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त मंडल स्तरावर विशेष व्याख्याने, चर्चासत्रे आणि त्या काळात तुरुंगवास भोगलेल्या मिसाबंदी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय मोदी सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडल स्तरावर प्रदर्शने, चित्रकला स्पर्धा आणि लाभार्थ्यांच्या अनुभवांचे व्हिडिओ प्रसारित करण्यात येणार आहेत.
बैठकीत पक्ष संघटनेच्या SIR नोंदणी अभियानाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. भोसरी, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये नोंदणीचे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत सुमारे ४० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी दिली. पुढील १५ दिवसांत हा आकडा ५० टक्क्यांच्या पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मार्गदर्शन करताना भाजप प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे यांनी पिंपरी-चिंचवड भाजपच्या कामगिरीचे कौतुक केले. पक्षाचे राष्ट्रीय आणि प्रादेशिक उपक्रम प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यात पिंपरी-चिंचवड शहर नेहमीच राज्यात अग्रेसर राहिले असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी उपक्रमांचे नियोजन आणि SIR नोंदणीतील प्रगती पाहता शहर संघटनेने पुन्हा एकदा आपले अव्वल स्थान सिद्ध केल्याचे त्यांनी नमूद केले.
या बैठकीस आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, माजी खासदार अमर साबळे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार अश्विनी जगताप, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सदाशिवराव खाडे, वैशाली खाडये, विकास डोळस यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र व मावळ परिसरातील विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मंडल अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन योगेश बाचलं यांनी केले. तर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता करण्यात आली.
