Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिघी येथील रेड क्लिफ स्कूलकडून NCERT पुस्तकांचा वापर न करता पालकांना महागड्या खाजगी प्रकाशनांची पुस्तके खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी शिक्षण विभागाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शाळेतील पालकांनी सादर केलेल्या तक्रारीनुसार, राज्य शासन व शिक्षण विभागाने NCERT पुस्तकांचा वापर करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही रेड क्लिफ स्कूलने २२ मे २०२६ रोजी आपल्या संकेतस्थळावर खाजगी प्रकाशनांच्या पुस्तकांची यादी प्रसिद्ध केली आहे. अनेक पालकांनी दोन महिन्यांपूर्वीच NCERT पुस्तके खरेदी केली असतानाही त्यांना नव्याने महागडी पुस्तके घेण्यास सांगितले जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
NCERT पुस्तकांचा खर्च साधारण ८०० ते १००० रुपये असताना खाजगी प्रकाशनांच्या पुस्तकांची किंमत ६५०० ते ७५०० रुपये असून संपूर्ण किटसाठी सुमारे १२ हजार रुपये खर्च येत असल्याने सर्वसामान्य पालकांवर मोठा आर्थिक भार पडत आहे.
याशिवाय, शाळेकडून पालक किंवा पालक-शिक्षक संघटनांना विश्वासात न घेता गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने फीवाढ करण्यात येत असल्याचाही आरोप पालकांनी केला आहे. मागील चार वर्षांच्या फीवाढीचे प्रकरण शासनाकडे प्रलंबित असतानाही पुन्हा फी वाढविण्यात येत असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब भोईर यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देत रेड क्लिफ स्कूलला NCERT पुस्तके वापरण्याचे कठोर लेखी आदेश देण्याची, महागड्या खाजगी पुस्तकांची सक्ती थांबविण्याची, आदेशांचे उल्लंघन झाल्यास शाळेविरुद्ध कारवाई करण्याची तसेच प्रलंबित फीवाढ प्रकरणाचा तातडीने निकाल लावण्याची मागणी केली आहे.
पालकांना न्याय मिळावा आणि त्यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रातील शुल्कवाढ आणि पुस्तकांच्या सक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version