Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीएमएल (PMPML) मधील हजारो कष्टकरी कामगारांचा अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला दिवाळी सानुग्रह अनुदानाचा (बोनस) प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार अमित गोरखे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि सकारात्मक पाठपुराव्यामुळे प्रशासनाने अखेर २० कोटींचा निधी मंजूर केला असून, प्रत्येक पात्र कामगाराच्या खात्यात २५ हजार रूपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सुमारे ९ हजार कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

दिवाळी उलटून गेल्याने कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण
पीएमपीएमएल मधील कामगारांना दरवर्षी ८.३३ टक्के बोनस तसेच महापालिकेच्या धर्तीवर सानुग्रह अनुदान देण्यात येते. मात्र, सन २०२५-२६ या वर्षातील सानुग्रह अनुदानाची रक्कम प्रलंबित राहिल्याने कामगारांमध्ये असंतोष व चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. दिवाळी सण उलटून अनेक महिने झाले तरी हक्काचे अनुदान न मिळाल्याने कामगार कुटुंबे अडचणीत आली होती. या पार्श्वभूमीवर, विविध कामगार संघटना आणि प्रतिनिधींनी आमदार अमित गोरखे यांची भेट घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची विनंती केली होती.

आमदार अमित गोरखे यांचा संवेदनशील पाठपुरावा
कामगारांची हीच व्यथा आणि न्याय्य मागणी लक्षात घेऊन आमदार अमित गोरखे यांनी तातडीने पीएमपीएमएल प्रशासन आणि संचालक मंडळाला पत्र दिले. केवळ पत्रव्यवहार न करता त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने वैयक्तिक पाठपुरावा केला आणि कामगारांची बाजू प्रभावीपणे मांडली. त्यांच्या या संवेदनशील आणि प्राधान्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले असून प्रशासनाने ₹२० कोटींचा निधी वर्ग केला आहे.

कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी
कष्टकरी कामगार बांधवांच्या हक्काचा पैसा त्यांच्या खात्यात जमा होत असल्याचा मला मनस्वी आनंद आहे. कामगारांचे प्रश्न आमच्यासाठी नेहमीच प्राधान्याचे राहिले आहेत. या संवेदनशील निर्णयाबद्दल मी पीएमपीएमएलचे संचालक मंडळ, प्रशासन आणि सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार मानतो. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आमचे सरकार आणि आम्ही सदैव कटिबद्ध आहोत व यापुढेही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे प्रतिपादन आमदार अमित गोरखे यांनी केले आहे.

कामगार वर्गात आनंदाचे वातावरण
आमदार अमित गोरखे यांच्या या यशस्वी मध्यस्थीमुळे कामगार वर्गातून अत्यंत सकारात्मक भावना व्यक्त होत आहेत. हक्काचे अनुदान थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्यामुळे हजारो कामगारांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, कामगार संघटनांनी आमदार गोरखे यांचे विशेष आभार मानले आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version