Spread the love

जॉन्सन कंट्रोल्स इंडिया आणि पर्णकुटी एनजीओ यांचा संयुक्त उपक्रम

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अल्प उत्पन्न गटातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी जॉन्सन कंट्रोल्स इंडियाने सीएसआर उपक्रमांतर्गत पर्णकुटी सामाजिक संस्थेच्या सहकार्याने महिलांना व्यवसाय किटचे वाटप करण्यात आले. त्यामुळे या महिलांची शाश्वत उपजीविका मजबूत होण्यास मदत होणार आहे.
पर्णकुटी सामाजिक संस्थेच्या वडगाव शेरी येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात या व्यवसाय किटचे वितरण करण्यात आले. यामध्ये आठ ब्युटी पार्लर युनिट्स, आठ शिवणकाम युनिट्स आणि दहा क्रोशे युनिट्सचा समावेश होता. यावेळी जॉन्सन कंट्रोल्स इंडियाच्या प्रीती वैष्णव, संचारी सिन्हा, पर्णकुटी संस्थेच्या संस्थापक स्नेहा भारती उपस्थित होते.
या मदतीमुळे महिलांना शाश्वत उत्पन्न निर्माण करण्यास आणि व्यवसाय उभारण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचा अप्रत्यक्षपणे शंभरहून जास्त महिलांना लाभ होणार आहे. कुटुंबाची उपजीविका, पोषण आणि मुलांच्या शिक्षणासाठी याचा फायदा होईल.
प्रीती वैष्णव म्हणाल्या, कौशल्य विकासासोबत बाजारपेठेतील संधी आणि उद्योजकता मदत दिल्यास महिलांचे सक्षमीकरण होऊन कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होते. पर्णकुटीच्या सहकार्याने आम्ही समाजाच्या सर्वसमावेशक विकास आर्थिक उन्नतीसाठी कार्य करत आहोत, ज्यामुळे महिलांना आत्मनिर्भर उद्योजक बनण्याची आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत योगदान देण्याची संधी मिळत आहे.
पर्णकुटीच्या संस्थापिका व सचिव स्नेहा भारती म्हणाल्या, महिलांना प्रशिक्षणापासून यशस्वी उद्योजकतेपर्यंत पोहोचविण्याचा मार्ग तयार होत आहे. तसेच बाजारपेठेतील संधी, मार्गदर्शन आणि सहकार्याच्या नेटवर्कद्वारे स्थानिक पातळीवर उपजीविकेचे सक्षम वातावरण निर्माण होत आहे. जॉन्सन कंट्रोल्ससारख्या बांधिलकी असलेल्या भागीदारांमुळे अनेक कुटुंबांना लाभ होत आहे.

पर्णकुटी संस्थेत यंदा ५५ महिलांनी प्रगत कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केले, ज्यामध्ये कापडी दागिने तयार करणे, क्रोशे तंत्र, प्रॉडक्ट फोटोग्राफी, सोशल मीडिया व मार्केटिंगसाठी प्रॉडक्ट डिझाईन, ग्राफिक्स यांचा समावेश होता. हे प्रशिक्षण उत्पादन गुणवत्ता, बाजारपेठेतील तयारी आणि रोजगारक्षमतेत वाढ करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. ज्यामुळे महिलांना विविध उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. या महिलांनी नुकतीच बारामती येथील कॉटनकिंग आणि कलावती इको-फ्रेंडली बॅग हाऊस या उत्पादन युनिट्सना भेट देऊन माहिती जाणून घेतली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version