पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंद्यांचे वाढते जाळे आणि ढासळलेली कायदा-सुव्यवस्था याबाबत तीव्र चिंता व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. शहरातील गंभीर परिस्थितीस विद्यमान पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी पोलीस आयुक्तांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक आणि रोजगाराचे केंद्र असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची प्रतिमा गेल्या काही काळात वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होत आहे. विषारी दारू प्रकरणामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून खून, टोलीगिरी, खंडणी, गोळीबार, महिलांवरील अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देहूरोड परिसरातील खून, राजकीय नेत्याची निर्घृण हत्या, चिंचवड व संत तुकारामनगर परिसरातील वाहनांची तोडफोड तसेच भररस्त्यात वाहनांवर होणारे हल्ले यामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नसल्याचे चित्र निर्माण झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. याशिवाय शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन असुरक्षित बनल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर खुलेआम सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे. या प्रकारामुळे शहराची सामाजिक प्रतिमा डागाळत असून महिला, विद्यार्थी आणि कुटुंबांना असुरक्षिततेचा सामना करावा लागत असल्याचे तायडे यांनी म्हटले आहे. तसेच अवैध गुटखा विक्री, मटका, लॉटरी, मादक पदार्थांचे जाळे आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रात्री १० नंतर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवरही निवेदनातून टीका करण्यात आली आहे. हे निर्बंध गुन्हेगारी रोखण्यात प्रभावी ठरले नसून त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि महिलांना सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सर्वसामान्यांवर निर्बंध लादले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
शहरातील कायदा-सुव्यवस्थेची उच्चस्तरीय चौकशी करून वाढत्या गुन्हेगारीस कारणीभूत असलेल्या त्रुटींचा शोध घ्यावा, विषारी दारू प्रकरण, खून, महिलांवरील अत्याचार, वाहनांची तोडफोड, संघटित गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच देहूरोड, चिंचवड, संत तुकारामनगर, पिंपरी, निगडी आणि भोसरी या संवेदनशील भागांमध्ये विशेष गुन्हेगारविरोधी मोहीम राबविण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवून पोलीस यंत्रणेवरील जनतेचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी विद्यमान पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करून त्यांच्या जागी सक्षम, कर्तव्यदक्ष आणि जनहिताला प्राधान्य देणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी इंजि. देवेंद्र तायडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
