Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – फुगेवाडी येथील संजयनगर परिसरात विषारी दारू सेवनामुळे झालेल्या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे आणि विधान परिषद सदस्या आमदार उमा खापरे यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले, “अवैध हातभट्टी व्यवसायामुळे निरपराध नागरिकांचे जीव जाणे ही अत्यंत वेदनादायी आणि गंभीर बाब आहे. या घटनेमुळे अनेक कुटुंबांचा आधार हरपला असून त्यांच्या दुःखाची भरपाई कोणत्याही स्वरूपात होऊ शकत नाही. या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच शहरातील अशा सर्व अवैध व्यवसायांवर तातडीने आणि प्रभावी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.”

यानंतर महापौर रवि लांडगे यांनी दापोडी पोलीस ठाण्यास भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणातील आरोपींना कोणतीही दया न दाखवता कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

आमदार उमा खापरे म्हणाल्या, “शहरातील अवैध हातभट्टी आणि तत्सम बेकायदेशीर धंदे तातडीने बंद करण्याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. अशा घटनांना जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होईल.”

दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ नागरिकांच्या कुटुंबीयांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे प्रत्येकी ₹१ लाख इतकी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाकडूनही संबंधित कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली.

यावेळी नगरसदस्य नवनाथ जगताप यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version