Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मागील तीन चार दिवसात पिंपरी चिंचवड मधील फुगेवाडी आणि हडपसर परिसरात विषारी गावठी दारूचे सेवन करून सुमारे १६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि काही उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि या घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपींवर आणि पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर “मोक्का” अंतर्गत कारवाई करावी. तसेच या घटनेत मृत झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड झोपडपट्टी विभाग अध्यक्ष रविंद्र ओव्हाळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, तसे पत्र रविंद्र ओव्हाळ यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात दिले आहे. यावेळी अमोल मिसाळ, चंदू हलगी, छोटू खान, दत्ता थोरात, गणेश गायकवाड आदी उपस्थित होते.

ओव्हाळ यांनी या पत्रात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर आणि पुणे जिल्हा ग्रामीण हद्दीत अनेक ठिकाणी हातभट्टीची दारू बेकायदेशीर विकली जाते. अनेक ठिकाणी पान टपरीवर देखील अंमली पदार्थ पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये सापडले आहेत. हातभट्टी दारू आणि अंमली पदार्थांच्या विळख्यामुळे येथील युवकांचे आणि लाखो कुटुंबांचे भवितव्य धोक्यात आले आहे. बेरोजगार तरुण, तरुणी या रॅकेटमध्ये अडकत आहेत. बेकायदेशीर दारू विक्री आणि अंमली पदार्थ विक्रीची ठिकाणे ज्या पोलीस स्टेशन हद्दीत सापडत आहेत. त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करावेत आणि उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबांना वाचवावे असे आवाहन या पत्राद्वारे रविंद्र ओव्हाळ यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version