Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवार, २८ मे रोजी एकाच दिवशी आठ नागरिकांचा झालेला संशयास्पद मृत्यू अत्यंत धक्कादायक, गंभीर आणि वेदनादायी आहे. एकाच परिसरातील आठ नागरिकांचा एकाच दिवशी अशा प्रकारे अचानक मृत्यू होणे ही सामान्य बाब नाही. स्थानिक नागरिकांच्या मनात या मृत्यूंविषयी मोठा संशय असून, परिसरात अवैध हातभट्टीच्या विषारी दारूमुळेच हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांनी केली आहे.

अतिशय दुर्दैवी घटना…

या घटनेची गंभीर दखल घेत आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त (CP) यांना तातडीने अधिकृत पत्र पाठवून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याविषयी अधिक बोलताना आमदार गोरखे म्हणाले, फुगेवाडीतील ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही मृत व्यक्तीच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहोत. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीती आणि तीव्र संतापाचे वातावरण आहे. जनतेच्या मनात निर्माण झालेला हा संभ्रम दूर करणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा तपास भरकटवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.

गुन्हेगारांवर तात्काळ कठोर कारवाई करा…

सर्व मृत नागरिकांचे शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवाल तातडीने मागवून घेऊन मृत्यूचे नेमके कारण काय आहे, हे लवकरात लवकर स्पष्ट करावे. दापोडी, फुगेवाडी या परिसरांसह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील कामगार व झोपडपट्टी परिसरांमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेले अनधिकृत हातभट्टीचे, बेकायदेशीर दारूचे व इतर अवैध अड्डे शोधून ते पुढील २४ तासांत तात्काळ उद्ध्वस्त करण्यात यावेत. जर या नागरिकांचा मृत्यू विषारी दारूमुळे किंवा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यामुळे झाला असल्याचे निष्पन्न झाले, तर त्यामागे असलेल्या मुख्य सूत्रधारांवर आणि गुन्हेगारांवर तात्काळ कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी. संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा बेकायदेशीर गोष्टी पुन्हा घडू नयेत, यासाठी रात्रीची पोलीस गस्त वाढवण्यात यावी आणि पोलिसांची गुप्तवार्ता यंत्रणा अधिक सतर्क करण्यात यावी, या मागण्या आमदार अमित गोरखे यांनी पोलीस आयुक्तांकडे केल्या आहेत.

या घटनेत एकाच वेळी आठ नागरिकांचा बळी गेला असतानाच, दुसरीकडे सुभाष डिगीकर आणि अक्षय अवसरमल हे दोन तरुण सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. पिंपरी-चिंचवड शहराला अवैध धंद्यांचा विळखा बसू दिला जाणार नाही. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा यासाठी मी स्वतः राज्याच्या गृहविभागाकडेही सातत्याने पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही आमदार अमित गोरखे यांनी दिली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version