Spread the love

चिंचवडला कामगार क्षेत्र : काल,आज आणि उद्या चर्चासत्र उत्साहात

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कामगारांच्या ताकतीचा मोठा इतिहास आहे, कामगार हा गुलाम नव्हे तर राष्ट्राची अस्मिता आहे त्याच्या घामाचे व श्रमाचे मूल्य जपले पाहिजे, कामगारांचे वाले कमी होत आहेत सरकार तर भांडवलदाराची भूमिका घेत असताना, गळा घोटत असताना संघटनानी विश्वासार्हता जपत कामगारांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहावे, कामगारांनो एक व्हा..! एक रहा बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल ही..असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला.

कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आयोजित रोटरी क्लब संभाजीनगर चिंचवड येथे कामगार क्षेत्र : काल आज आणि उद्या यावर अध्यक्षीय भाषणाच्या दरम्यान ते बोलत होते. यावेळी संयोजक कामगार नेते काशिनाथ नखाते, ज्येष्ठ नेते अध्यक्ष मानव कांबळे, किमान वेतन सल्लागार समितीचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक, महाराष्ट्र मजदूर संघाचे अध्यक्ष इरफान सय्यद, कामगार नेते सचिन लांडगे, दैनिक सकाळचे पत्रकार जयंत जाधव, दैनिक केसरीचे पत्रकार नंदकुमार सातूर्डेकर, किमया कम्युनिकेशनचे जयंत शिंदे, आशिष शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी कामगार रत्न पुरस्कार म्हणून भरत शिंदे यांना देण्यात आला तर कामगार सन्मित्र पुरस्कार दैनिक सकाळचे पत्रकार जयंत जाधव यांना देण्यात आला. नारायण मेघाजी लोखंडे व पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. आता उठवू सारे रान…या गीताला कामगारांनी दाद दिली.

प्रास्तावितकात नखाते म्हणाले की, यापूर्वी राज्यात गिरणी कामगारांपासून कामगारांच्या जे जे लढे झाले त्यामध्ये बहुतांशी यश प्राप्त झालेला आहे, काही ठिकाणी अपयश आले कामगारांच्या इतिहासातून शिकायला मिळते. शेतकरी आणि कामगारांची भूमिका नेहमीच निर्णय राहिलेले आहे. शेतकरी लढले आणि जिंकले मात्र आता कामगार सुद्धा लढतील, कामगार संघटना वेगवेगळ्या पद्धतीने लढत असतील तरी आता कामगारांच्या पुढे उभे ठाकलेले संकट पाहता सर्व कामगार संघटनांनी एकत्रित येऊन नव्या कामगार कायद्यातले आवश्यक बदल दुरुस्तीसाठी आणि कामगार हितासाठी पुढील काळासाठी दिशा देणे गरजेचे आहे.
मानव कांबळे म्हणाले, शहरात सुरुवातीच्या कालावधीमध्ये कामगारांना घरे देण्यात आले, रोजगार देण्यात आला, पगार वाढ दिली मात्र आताच्या कालावधीमध्ये काही दिले जात नाही. पिंपरी चिंचवड शहरातील दादा रुपमय चटर्जी, प्रभाकर मानकर, श्री पिल्ले, विनायक चक्रे यांचे योगदान विसरता येणार नाही. बजाजचा लढा आम्ही यशस्वी केला.

लांडगे म्हणाले, कामगार लढ्यात अनेकांनी शहीदत्त्व स्वीकारले मात्र बाजूला गेले नाही. कायदे समजून घेणे गरजेचे आहे. कामगारांनी सुद्धा संघटनेसोबत एकनिष्ठता ठेवणे गरजेचे आहे.

इरफान सय्यद म्हणाले, नव्या तरतुदीमध्ये काही चांगले आहे काही मध्ये बदल करण्याची गरज आहे, मात्र कामगारांच्या हितासाठी नेहमीच संघटनात्मक काम पुढे चालू ठेवणे गरजेचे आहे.

कुचिक म्हणाले, वेतनश्रेणी मध्ये महत्त्वाच्या दुरुस्त्या गरजेच्या असून कंपन्यांचे 87 गट निर्माण केले. आम्ही महत्वाचे निर्णय घेतले होते. कामगारांच्या प्रश्नावर विविध ठिकाणी गेल्यानंतर आम्ही ठाम भूमिका मांडतो. तळेगाव येथील जनरल मोटर कंपनीचे जसे नुकसान झाले तसे इतरत्र व्हायला नको.

घावटे म्हणाले की, शहरात उद्योग उभे राहिले आणि उद्योगांचा नव्हे तर कामगारांचा सुद्धा विकास झाला. कामगार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पुढे जात आहेत तसे या परिस्थितीला जोडून घेऊन कामगाराने पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी सिद्धनाथ देशमुख, राजेश माने, किरण साडेकर, माधुरी जलमूलवार, मुमताज शेख,तुषार घाटुळे, स्वाती पालके, चंद्रकांत कुंभार, अनिल बारवकर, सुनील भोसले, लाला राठोड आदींनी परिश्रम घेतले. राजू बिराजदार यांनी आभार मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version