Spread the love

नागरिकांचा संताप; हलगर्जी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कृष्णानगर परिसरातील पाण्याच्या टाकीमधून आज मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाऊन लाखो लिटर पाणी वाया गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा व कामचुकारपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

याच कृष्णानगर परिसरात यापूर्वी पाण्याच्या टाकीशी संबंधित गंभीर दुर्घटना घडून टाकी कोसळण्याचा प्रकार झाला होता. त्या घटनेनंतरही प्रशासनाने कोणताही धडा घेतला नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. “इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही सुरक्षेच्या उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, प्रभाग क्रमांक ११ मधील स्थानिक नगरसेवकांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका संगीता नानी ताम्हाणे यांनी कार्यकर्त्यांना घेऊन स्वतः पाण्याच्या टाकीवर जाऊन कॉक बंद करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकारानंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता काही कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी संबंधित हलगर्जी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार मारुती जाधव यांनीही प्रशासनावर जोरदार टीका करत, “नागरिकांच्या जीवाशी आणि पाण्यासारख्या महत्त्वाच्या संसाधनाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणे थांबवावे,” अशी मागणी केली.
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version