Spread the love

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशभरातील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला राज्य सरकारतर्फे ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

या निर्णयामुळे धार्मिक पर्यटन, पायाभूत सुविधा आणि परिसर विकासाला मोठी चालना मिळणार आहे. १८९३ मध्ये स्थापन झालेल्या या ट्रस्टला तब्बल १३५ वर्षांची वैभवशाली परंपरा लाभली आहे. हे मंदिर केवळ भक्तीचे स्थान नसून, समाजसेवा आणि सांस्कृतिक संवर्धनातही याचे मोठे योगदान आहे. दररोज देश-विदेशातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

यापूर्वी मंदिराला जिल्हा नियोजन समितीकडून ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त होता. संस्थेचे सामाजिक कार्य आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून या मंदिरास ‘अ’ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती.

‘अ’ वर्ग दर्जा मिळण्याचे फायदे:
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मंदिर आणि परिसराचा तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून सर्वांगीण विकास वेगाने होणार आहे. ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने राज्य सरकारकडून विकासासाठी थेट आणि मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होईल. या निधीच्या माध्यमातून देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी अद्ययावत दर्शन रांग व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ (पार्किंग), स्वच्छतागृहे, भक्तनिवास आणि सुरक्षेच्या अत्याधुनिक उपाययोजनांसारख्या पायाभूत सुविधा उभारणे शक्य होणार आहे. यामुळे पुण्यातील धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळेल.

१८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर तीर्थक्षेत्राचा अ दर्जा मिळवणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे पहिलेच गणेशोत्सव मंडळ आहे. गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्या मागणीला पाठिंबा देत, ती पूर्ण केली. लाखो गणेश कार्यकर्त्यांच्या वतीने मी देवेंद्रजी यांचे मनापासून आभार मानतो.
– हेमंत रासने, आमदार

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version