Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांविरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आक्रमक झाली असून, शहराध्यक्ष चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या केबिनला घेराव घालत जोरदार निषेध नोंदवला.

शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. याबाबत वारंवार पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ताथवडे येथील सर्वे नं. ६४ च्या नाल्याचा प्रश्न, ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळा महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा मुद्दा, दापोडी येथील क्रीडांगण, वाल्हेकरवाडी येथील पाणीटंचाई, पिंपरी येथील मंडईतील अतिक्रमण, तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत अशा अनेक प्रश्नांवर तक्रार निवारणासाठी आयुक्तांकडे वेळ मागितली होती. मात्र, प्रत्येक वेळी काही ना काही कारण देत भेट टाळली गेल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे प्रशासन नागरिकांच्या प्रश्नांबाबत उदासीन असल्याची टीका करण्यात आली.

दरम्यान, संतप्त शिवसैनिकांनी थेट आयुक्तांच्या केबिनसमोर जाऊन घोषणाबाजी करत घेराव घातला. या प्रकारामुळे काही काळ महापालिकेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

यावेळी माध्यमांशी बोलताना शहराध्यक्ष चेतन पवार यांनी प्रशासनावर पक्षपातीपणाचा गंभीर आरोप केला. “आमच्या पक्षाला वारंवार वेळ मागूनही भेट दिली जात नाही, मात्र भाजप पदाधिकाऱ्यांना तत्काळ वेळ देऊन त्यांच्या समस्या ऐकल्या जातात. हा स्पष्ट दुजाभाव आहे,” असे ते म्हणाले. तसेच, “शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम्ही येतो, तरीही आम्हाला दुर्लक्षित केले जाते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचे कारभारी आयुक्त हे ‘पळकुटे कारभारी’ असल्याचेच दिसून येते,” अशी टीका त्यांनी केली.

पुढे बोलताना चेतन पवार यांनी इशारा दिला की, “जर आम्हाला येत्या चार दिवसांत आयुक्तांची भेट मिळाली नाही, तर आयुक्त जिथे जिथे जातील तिथे त्यांचा पाठलाग करून नागरिकांच्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडण्यात येईल.” तसेच, हे पाठलाग आंदोलन येणाऱ्या काळात आणखी तीव्र करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने प्रशासनाला इशारा देत सांगितले की, नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्यात येईल.

या आंदोलनात अनिता तुतारे, रोमी सिंधू, तुषार नवले, कैलास नेवासकर, युवराज कोकाटे, सतीश मरळ, श्रीमंत गिरी, विशाल चव्हाण, गोरखनाथ पाटील, संदीप मालके, डॉ. दत्ता शेटे, योगेश पवार, वैभवी घोडके, कल्पना शेटे, ज्योतीताई भालके, तसलीम शेख व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version