Spread the love

देशहित की विदेशवारी? मोदींच्या आवाहनानंतर महापौर रवी लांडगे कोणता निर्णय घेणार याकडे शहराचे लक्ष

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देश आर्थिक शिस्त, काटकसर आणि जबाबदारीची भाषा ऐकत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेत मात्र परदेश दौऱ्याची तयारी जोरात सुरू असल्याने मोठा राजकीय आणि नैतिक प्रश्न निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी अनावश्यक खर्च टाळा, काटकसर करा आणि परदेश दौरे कमी करा, असे स्पष्ट आवाहन केल्यानंतर अवघ्या काही तासांत महाराष्ट्र शासनाने पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या अझरबैजान दौऱ्याला मान्यता दिली. त्यामुळे “भाजप सरकारच पंतप्रधानांच्या आवाहनाला हरताळ फासत आहे का?” असा सवाल आता शहरातून उपस्थित केला जात आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या UN-Habitat संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड अर्बन फोरम’ या जागतिक परिषदेसाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक अभय चौगुले हे १७ ते २२ मे दरम्यान बाकु, अझरबैजान येथे जाणार आहेत. या दौऱ्यासाठी तब्बल ८ लाख ८० हजार २८१ रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. स्थायी समितीने यासाठी निधी मंजूर केल्याने विरोधकांसह नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
एकीकडे शहरात पाणीटंचाई, रस्त्यांचे प्रश्न, वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामे, आरोग्य व्यवस्थेचे प्रश्न कायम असताना दुसरीकडे महापौरांच्या परदेश दौऱ्यावर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याची गरज काय? असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

विशेष म्हणजे केंद्रात, राज्यात आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता असताना स्वतःच्या पक्षाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “देशहितासाठी काटकसर करा” असे सांगणाऱ्या मोदींच्या भूमिकेला महाराष्ट्र शासनानेच छेद दिल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
दरम्यान, महापौर रवी लांडगे यांनी या दौऱ्याचे समर्थन करताना “मी फिरायला जात नाही, तर शहराच्या विकासाच्या दृष्टीने आयोजित जागतिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जात आहे,” असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे अभ्यास दौरे रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर, “हा आदेश अभ्यास दौऱ्यांनाही लागू होत असेल तर मीही माझा दौरा रद्द करेन,” असे म्हणत लांडगेंनी माघार घेण्याचे संकेतही दिले आहेत.

आता खरा प्रश्न असा निर्माण झाला आहे की, शहराचे प्रथम नागरिक म्हणून रवी लांडगे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्राधान्य देणार की आधीच मंजूर झालेल्या परदेश दौऱ्यावर ठाम राहणार?
१७ मे जवळ येत असताना पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष आता एका निर्णयाकडे लागले आहे —
“महापौर देशहितासाठी परदेश दौरा रद्द करणार, की सरकारी पैशावर विदेशवारी कायम ठेवणार?”

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version