Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगामध्ये सध्या सुरु असलेल्या आखाती युद्धामुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून, त्याची झळ भारतासारख्या विकसनशील देशांनाही बसत आहे. कच्च्या तेलाचे वाढते दर, मजबूत होत चाललेला अमेरिकन डॉलर, रुपयाची घसरण आणि आयात खर्चातील वाढ यामुळे भारतातील महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेब यांनी देशहिताच्या दृष्टीने नागरिकांना सोने-चांदी खरेदी, पेट्रोल-डिझेल वापर तसेच खाद्यतेल वापरामध्ये संयम राखण्याचे केलेले आवाहन हे केवळ आर्थिक नव्हे तर राष्ट्रीय जबाबदारीचे प्रतीक असल्याचे मत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केले. पिंपरी येथे पत्रकार परिषदेत (दि.१३)ते बोलत होते.

यावेळी बोलताना कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की,भारत हा कच्च्या तेलासाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे, खाद्यतेलासाठी परदेशी बाजारावर अवलंबून आहे, तसेच सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात करतो. युद्धजन्य परिस्थितीत डॉलर मजबूत झाल्यास रुपयाची किंमत कमी होते, आयात महाग होते, पेट्रोल-डिझेल दर वाढतात, वाहतूक खर्च वाढतो, शेती उत्पादन खर्च वाढतो, आणि शेवटी सामान्य नागरिकांवरील महागाईचा भार वाढतो. याचा सर्वाधिक परिणाम मजूर वर्गावर, शेतकरी बांधवांवर, मध्यमवर्गीय कुटुंबांवर, लघुउ‌द्योग आणि छोट्या व्यावसायिकांवर होतो. डिझेल महाग झाल्यास ट्रॅक्टर पंप, शेती मशागत खर्च वाढतो. मालवाहतूक महाग होते. भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतात.

पेट्रोल-डिझेल वापरामध्ये संयम, अनावश्यक खरेदी टाळणे, स्थानिक उत्पादनांचा वापर वाढवणे आणि देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी सहकार्य करणे ही आज काळाची गरज आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे मत स्पष्ट आहे की, देश आर्थिकदृष्ट्या मजबूत राहिला तरच मजूर, शेतकरी आणि सामान्य नागरिक सुरक्षित राहतील. त्यामुळे ही केवळ सरकारची लढाई नसून प्रत्येक भारतीयाची सामूहिक जबाबदारी आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करणे, आवश्यक वस्तूंवरील नियंत्रण मजबूत करणे, कामगार व शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे, रोजगारनिर्मिती वाढवणे, या बाबींवरही ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. आज भारत एका आर्थिक आव्हानात्मक टप्प्यावर उभा आहे. या काळात संयम, राष्ट्रीय एकात्मता आणि आर्थिक शिस्त या माध्यमातून आपण देशाला अधिक सक्षम बनवू शकतो असे मत कामगार नेते यशवंत भोसले यांनी व्यक्त केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version