Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे काम अंध, अपंग व दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेमार्फतच करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते तथा दिव्यांग भवन फाऊंडेशनचे संचालक भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. यासाठी त्यांनी “श्री. जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित, सोलापूर” या संस्थेला काम देण्याची शिफारस केली आहे.

यासंदर्भात महापालिकेला दिलेल्या निवेदनात भोईर यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणारे बहुसंख्य विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मनपा शाळांबाबत आकर्षण निर्माण व्हावे, शैक्षणिक गुणवत्ता वाढावी आणि शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी शिक्षण समिती विविध प्रयत्न करीत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष जून २०२६ पासून सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय साहित्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा उद्योग विभागाच्या शासन निर्णयानुसार शालेय गणवेश, पी.टी. गणवेश, ओढणी, स्वेटर, सॉक्स, रेनकोट, दप्तर, वेस्टकोट, नॅपकिन, हेअर बँड, रिबीन, लेगिन्स, टाय आदी साहित्य खरेदीबाबत दरनिश्चिती करण्यात आलेली आहे. संबंधित शासन निर्णयानुसार ही उत्पादने अंध, अपंग व दिव्यांग संस्थांसाठी राखीव असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महापालिकेतील विद्यार्थ्यांना गतवर्षीच्या रंगसंगतीप्रमाणे उत्तम दर्जाचे दोन नियमित गणवेश, दोन पी.टी. गणवेश, स्वेटर, वेस्टकोट, सॉक्स, रेनकोट, दप्तर तसेच इतर साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

“श्री. जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित, सोलापूर” ही संस्था अंध, अपंग व दिव्यांग नागरिकांसाठी रोजगारनिर्मितीचे कार्य करीत असून त्यांच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या संस्थेकडून दर्जेदार साहित्य पुरवले जाईलच, शिवाय सामाजिक दायित्वाच्या भावनेतून महापालिकेच्या प्रतिमेतही भर पडेल, असे भोईर यांनी निवेदनात म्हटले आहे.

गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वेळेत मिळाल्यास त्यांच्या शिक्षणाला चालना मिळेल आणि मनपा शाळांबाबत पालकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version