छत्रपती संभाजीनगर येथे प्रबोधन पर्वाची जोरदार तयारी सुरू, महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते रंगमंच उभारणीचा शुभारंभ
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘छत्रपती संभाजी महाराज विचार प्रबोधन पर्वा’च्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार, कार्य आणि इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. १० मे ते १४ मे २०२६ या कालावधीत होणाऱ्या या विचार प्रबोधन पर्वात विविध सांस्कृतिक, प्रबोधनात्मक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी जागर निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रमही यानिमित्त राबविण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील छत्रपती संभाजीनगर येथे दि. १० मे ते १४ मे २०२६ या कालावधीत ‘छत्रपती संभाजी महाराज विचार प्रबोधन पर्व’ आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या तयारीला प्रारंभ झाला असून कार्यक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या रंगमंचाच्या कामाचा शुभारंभ महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य कुशाग्र कदम, तुषार हिंगे, निलेश नेवाळे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे यांच्यासह महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराजांचे व्यापक विचार आणि कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे तसेच या प्रबोधन पर्वाच्या माध्यमातून नागरिकांना इतिहासाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास महापौर रवि लांडगे व्यक्त केला.
यावेळी त्यांनी प्रबोधन पर्वाच्या तयारीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला आणि या कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांना वाहनतळ, पिण्याचे शुद्ध पाणी, स्री-पुरूष स्वतंत्र स्वच्छतागृह तसेच आपत्कालीन सेवा यासारख्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.
