पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे दिवसेंदिवस महागाई वाढत असून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ९९३ रुपयांनी झालेली वाढ ही केवळ गॅस दरवाढ नसून सामान्य नागरिकांच्या खाद्यपदार्थांच्या दरवाढीची सुरुवात असल्याची टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.
कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले की, देशभरात महागाईचा भडका उडाला असून वारंवार दरवाढ केली जात आहे. अवघ्या तीन महिन्यांमध्ये तब्बल ८१ % दर वाढ करून फेब्रुवारी महिन्यापासून १३८० रुपये दरवाढ केली आहे. व्यावसायिक गॅसच्या दरवाढीचा थेट परिणाम छोट्या व्यावसायिकांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांवर होत आहे. याचे सरकारला काही पडलेले नाही.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे थरमॅक्स चौकात कामगारांकडून सदरच्या दरवाढीचा सरकारला जाब विचारला आहे. दरवाढीमुळे विद्यार्थी, कामगार, छोटे दुकानदार, नोकरदार, सामान्य नागरिक संकटात सापडले असून महागाईने त्यांचे कंबरडे मोडलेले आहे. या दरवाढीने कॅन्टीन चालक, छोटे हॉटेल धारक, स्टॉल धारक यांना नाईलाजास्तव दर वाढवावे लागणार आहेत दर वाढवल्यास ग्राहकांची संख्या कमी होण्याची भीती तर न वाढवल्यास आर्थिक नुकसानीचे संकट अशा स्थितीमध्ये छोटे व्यावसायिक जगत आहेत. एकीकडे जीएसटीचा फटका आणि दुसरीकडे महागाईचा फटका अशी दुहेरी संकटात छोटे व्यावसायिक आणि सामान्य नागरिक सापडल्याचे कामगार नेते नखाते यांनी म्हटले आहे.
सरकारने तातडीने महागाई नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
