पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मधुश्री कला आविष्कार आणि स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था, निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेचा प्रारंभ बुधवार, दिनांक ०६ मे २०२६ रोजी होणार आहे. स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, प्लॉट क्रमांक ५१३, पेठ क्रमांक २७, संत तुकाराममहाराज उद्यानासमोर, निगडी प्राधिकरण येथे दररोज सायंकाळी ठीक ०६:३० वाजता व्याख्यान सुरू होईल.
सोळाव्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या मधुश्री व्याख्यानमालेत बुधवार, दिनांक ०६ मे रोजी गणेश ठोकळ ‘स्वराज्याचा अपरिचित इतिहास’ या विषयावर प्रथम पुष्पाची गुंफण करतील. लायन्स क्लब इंटरनॅशनलचे माजी रिजन चेअरमन दामाजी आसबे यांची अध्यक्ष आणि नगरसेविका शैलजा मोरे प्रमुख पाहुण्या म्हणून यावेळी उपस्थिती राहील.
गुरुवार, दिनांक ०७ मे रोजी डाॅ. काशिनाथ देवधर ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावर द्वितीय पुष्पाची गुंफण करतील. उद्योजक अतुल इनामदार अध्यक्षस्थान भूषविणार असून उपमहापौर शर्मिला बाबर प्रमुख पाहुण्या आहेत.
व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प शुक्रवार, दिनांक ०८ मे रोजी चंद्रशेखर टिळक ‘जागतिक राजकारण आणि काश्मीर’ या विषयावर गुंफणार आहेत. पद्मश्री गिरीश प्रभुणे अध्यक्षस्थानी असतील तर नगरसेवक कैलास कुटे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहील.
व्याख्यानापूर्वी, दररोज सायंकाळी ६:०० ते ६:३० या वेळेत श्रोत्यांसाठी चहापानाची व्यवस्था करण्यात येणार असून नि:शुल्क असलेल्या या व्याख्यानमालेचा नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन मधुश्री कला आविष्कार या संस्थेच्या अध्यक्षा माधुरी ओक यांनी केले आहे.
