Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘पिंक ई-रिक्षा’ योजनेत तब्बल ४०० कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केला आहे. या कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ आणि फसवणूक झालेल्या महिला रिक्षाचालकांना न्याय मिळवून देण्यासाठी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे जोरदार आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान डॉ. बाबा कांबळे यांनी ‘ग्रीन कॅनिटिक’ कंपनीवर थेट आरोप करत सांगितले की, शासनाच्या मूळ टेंडरमध्ये आधुनिक L-5 श्रेणीतील ई-रिक्षा देणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात महिलांना जुन्या आणि निकृष्ट दर्जाच्या L-3 श्रेणीतील रिक्षा देण्यात आल्या. “सुमारे १.२० लाख रुपये किंमत असलेली रिक्षा तब्बल ४ लाख रुपयांना विकून महिलांची आर्थिक लूट करण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला.

यावेळी त्यांनी सांगितले की, या रिक्षांचा वेग मर्यादित असल्यामुळे त्यांना शहरात प्रवासी वाहतुकीची परवानगी मिळत नाही. परिणामी अनेक महिलांचा रोजगार धोक्यात आला असून उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, आंदोलनासाठी पुण्यातून पिंपरीकडे येताना अनेक महिलांच्या ई-रिक्षा वाटेतच बंद पडल्याने आंदोलनाला आणखी तीव्र स्वरूप प्राप्त झाले. संतप्त महिलांनी नादुरुस्त रिक्षांसह रस्त्यावर उतरून निषेध नोंदविला. “निकृष्ट दर्जाच्या रिक्षांमुळे आमचे आर्थिक नुकसान होत असून कर्ज फेडणेही कठीण झाले आहे,” अशी भावना महिला चालकांनी व्यक्त केली.

आंदोलनानंतर डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक पी. बी. कुंभार यांना निवेदन दिले. यावेळी संबंधित कंपनी मालक आणि कथित भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने यावेळी काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करून एफआयआर दाखल करणे, फसवणूक झालेल्या महिलांचे ४ लाख रुपये व्याजासह परत मिळवून देणे, दोषी कंपनीला काळ्या यादीत टाकणे आणि नवीन L-5 योजनेसाठी महिलांना थेट २ लाख रुपयांचे अनुदान देणे यांचा समावेश आहे.
या आंदोलनात आशा बाबासाहेब कांबळे, राणी तांगडे, जयश्री मोरे, अर्चना खडगोड, शितल सूर्यवंशी, ज्योती धनविजय, कुसुम खंदारे, श्रद्धा घाग, आम्रपाली कांबळे, ज्योती भोसले, शीला बिराजदार, लुबाना शेख, अनुराधा कदम, जाहिरा कुरेशी, मनीषा वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला रिक्षाचालक सहभागी झाल्या होत्या.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version