राजगुरुनगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) “कुंपणच शेत खाऊ लागल्यावर काय होणार?” अशीच परिस्थिती सध्या महावितरणच्या राजगुरुनगर उपविभागात पाहायला मिळत आहे. महावितरणमध्ये बाह्यस्रोत कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने कोणतीही अधिकृत मंजुरी न घेता अनधिकृत वीज वाहिनी उभारून औद्योगिक ग्राहकाला वीज जोडणी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुनील सहदेव मिटकर (रा. शिरोली, ता. खेड) याच्याविरोधात विद्युत कायदा २००३ च्या कलम १३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लादवड गाव, पिंपरी बुद्रुक (ता. खेड) येथील एका ग्राहकाला महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडणी मंजूर करण्यात आली होती. मात्र संबंधित वीज मीटर बाह्यस्रोत कर्मचारी सुनील मिटकर याने परस्पर एका औद्योगिक ग्राहकाला बसविल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर कोणतीही अधिकृत प्रक्रिया पूर्ण न करता त्याने स्वतंत्र वीज वाहिनी उभारून थेट वीजपुरवठाही सुरू केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
हा प्रकार राजगुरुनगर ग्रामीण शाखा क्रमांक २ चे सहाय्यक अभियंता अविनाश उरुणकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन तपासणी केली.
तपासादरम्यान संबंधित औद्योगिक ग्राहकानेच “सुनील मिटकर यांनी मीटर बसवून जोडणी दिली,” अशी कबुली दिल्याचे समोर आले. त्यानंतर सहाय्यक अभियंता उरुणकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मिटकर याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, राजगुरुनगर उपविभागात यापूर्वीही वीज रोहित्र विक्रीसारखे गंभीर प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात केवळ एका कर्मचाऱ्याची भूमिका नसून त्याला अन्य सहकारी किंवा अधिकाऱ्यांचे पाठबळ होते का, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात असून महावितरण प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
