Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील विद्युत पोलवर टाकण्यात आलेल्या बेकायदेशीर केबल्समुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असून या प्रकाराची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक तथा महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष सौंदणकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत ऑप्टिकल फायबर केबल डक्ट तयार करण्यात आले असतानाही अनेक भागांत टेलिफोन, इंटरनेट आणि टेलिकॉम कंपन्यांच्या सेवा वाहिन्या अद्यापही विद्युत पोलवर टाकल्या जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत असून वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी निगडी प्राधिकरण सेक्टर २६ परिसरात लोखंडी केबल रस्त्यावर लोंबकळत असल्याने शाळेतून घरी परतणाऱ्या संपदा पाटवर्धन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतरही प्रशासनाने गंभीर दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शिवसेनेकडून महापालिकेकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
शहरातील सर्व विद्युत पोलवरील बेकायदेशीर केबलची तात्काळ चौकशी करावी.
संबंधित केबल कंपन्या व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
धोकादायक आणि अनधिकृत केबल त्वरित हटवाव्यात.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
दिवंगत संपदा पाटवर्धन यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करावी.
आयुक्तांनी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संतोष सौंदणकर यांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version