छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमाला – प्रथम पुष्प
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सहिष्णू समाजाने असहिष्णू विचार नष्ट करावेत!’ असे प्रतिपादन माजी खासदार प्रदीप रावत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे (शुक्रवार, दिनांक ०१ मे) व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित तीन दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेत ‘भारतीय राज्यघटनेतील धर्मस्वातंत्र्य आणि इस्लाम’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना प्रदीप रावत बोलत होते. डॉ. गिरीश आफळे, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष विजयशंकर कर्ता, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. डॉ. अजित जगताप यांनी प्रास्ताविकातून छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेची आणि मंडळाच्या नवीन उपक्रमांची माहिती दिली. डॉ. गिरीश आफळे यांनी विशिष्ट ध्येयातून सलग बेचाळीस वर्षे छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमाला चालविण्यात येत आहे, ही अतिशय स्तुत्य बाब आहे, असे गौरवोद्गार काढले.
प्रदीप रावत पुढे म्हणाले की, ‘भारत अखंड राहिला असता तर आजची राज्यघटना राहिली असती का, असा प्रश्न पडतो. अर्थातच त्याचे उत्तर नाही असेच आहे. इंग्रजांना हटवायचे असेल तर हिंदू – मुस्लीम ऐक्य अपरिहार्य आहे, अशी तत्कालीन नेत्यांची भावना होती. त्यासाठी लोकमान्य टिळकांनी लखनौ कराराच्या माध्यमातून प्रयत्न केले; तर त्यानंतर गांधींनी पॅन इस्लामिक चळवळीला पाठिंबा दिला. खिलाफत चळवळीमुळे मुस्लिमांची रौद्र अन् क्रूर मानसिकता उघड झाली. तरीही काहीतरी दिल्याशिवाय हिंदू – मुस्लीम ऐक्याचे गारुड उलगडणार नाही, अशीच हिंदू नेत्यांची भावना होती. त्यासाठी अखंड भारताचे संविधान तयार करण्याचे प्रयत्न अनेकदा केले गेले. या पार्श्वभूमीवर हिंदू आणि मुस्लीम अशी दोन राष्ट्र निर्माण करावीत, अशी मुस्लीम नेत्यांची मानसिकता होती. भारतीयांमध्ये फूट पडावी या उद्देशातून इंग्रजांनी हिंदू, मुस्लीम आणि दलित असे स्वतंत्र मतदारसंघ करावेत, अशी संकल्पना मांडली होती; पण सुदैवाने अखंड भारताबाबत हिंदू नेत्यांचा भ्रमनिरास झाला. एक हजार वर्षे हिंदू समाज आपल्या संस्कृतीसाठी संघर्ष करीत होता. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या स्वराज्याने हिंदूंचे स्वत्व अन् स्वाभिमान स्थापित केला. मुस्लीम समाज जगात कोठेही अन्य धर्मियांसोबत सह अस्तित्वाने शांततेत राहू शकत नाही; कारण जे इस्लाम मानत नाहीत अशा काफिरांना मृत्युदंड देण्याची कुराणमध्ये आज्ञा केली आहे. भारत – पाकिस्तान फाळणी आणि बांगलादेशची निर्मिती यामुळे मुस्लीमशक्ती तीन हिश्शात विभागली गेली आहे; अन्यथा आज आपली अवस्था लेबनानसारखी झाली असती. लोकशाहीमुळे भारतात सर्वांना समान दर्जाचा हक्क आणि अधिकार आहेत. धर्मग्रंथांचा अभ्यास करून निर्णय देणे हे न्यायालयाचे काम नाही. धर्मस्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे हे जितके खरे तितकेच धर्माच्या आधारावर लौकिक जीवनातील फायदे मिळणार नाहीत, हे समान नागरी कायद्याची निर्मिती करून अधोरेखित करण्याची आवश्यकता आहे!’ विविध संदर्भ उद्धृत करीत प्रदीप रावत यांनी विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली.
शिवानंद चौगुले आणि रश्मी दाते यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. ॲड. हर्षदा पोरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत पेडणेकर यांनी आभार मानले. पसायदानाने समारोप करण्यात आला.
