पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नसरापूर येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी हा यापूर्वीही लैंगिक छळ प्रकरणात शिक्षा भोगून बाहेर आलेला असल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी युवा आघाडीने आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. “अशा नराधमांना कायद्याची भीती राहिलेली नाही. त्यामुळे आरोपीचा १० दिवसांच्या आत एन्काऊंटर करण्यात यावा, अन्यथा आम आदमी पार्टी युवा आघाडीच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत पीडित कुटुंबाला तातडीने न्याय देण्याची मागणी केली. तसेच अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कायदे आणि जलद न्यायप्रक्रिया राबविण्याची मागणीही करण्यात आली.
दरम्यान, पोलिसांकडून आरोपीविरोधात कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
