Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘पिंक ई-रिक्षा’ योजनेत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि पिंक महिला रिक्षा चालक-मालक संघटनेने केला आहे. या कथित भ्रष्टाचाराविरोधात आणि फसवणूक झालेल्या महिला चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी मंगळवार, ५ मे रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी येथे रिक्षासह धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथून सुरू होणारा हा मोर्चा ‘ग्रीन कॅनेटी’ कंपनीच्या शोरूमपर्यंत जाणार असून, फसवणूक झालेल्या महिला त्यांच्या नादुरुस्त रिक्षांसह आंदोलनात सहभागी होणार आहेत. कंपनी मालक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे.
संघटनेच्या आरोपानुसार, शासनाने १० हजार पिंक रिक्षांसाठी ४०० कोटी रुपयांचे टेंडर काढले होते. मात्र, मूळ टेंडरमध्ये आधुनिक L-5 श्रेणीतील रिक्षा अपेक्षित असताना महिलांना जुन्या L-3 श्रेणीतील रिक्षा देण्यात आल्या. या रिक्षांचा वेग कमी असून, आरटीओ नियमानुसार शहरी भागात व्यावसायिक वाहतुकीसाठी त्या अपात्र असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय बाजारात १.२० ते २ लाख रुपयांत मिळणाऱ्या रिक्षा महिलांना तब्बल ४ लाख रुपयांना विकण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे महिलांची आर्थिक फसवणूक करून शासन निधीवर डल्ला मारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

डॉ. बाबा कांबळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र रिक्षा पंचायतने २०१९ मध्ये स्वबळावर १०० महिलांना पिंक रिक्षा देऊन ही संकल्पना यशस्वी केली होती. मात्र, नंतर काही भांडवलदारांनी हस्तक्षेप करून संपूर्ण योजनेची वाट लावली. सध्या १० हजारांपैकी केवळ १३७ रिक्षाच रस्त्यावर धावत असून, त्याही वारंवार बंद पडत असल्याचा आरोप त्यांनी केला.

या प्रकरणी ACB मार्फत चौकशी, संबंधितांवर FIR, महिलांचे पैसे व्याजासह परत, भ्रष्ट टेंडर रद्द करणे आणि महिलांना नवीन L-5 रिक्षांसाठी २ लाखांचे थेट अनुदान देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
या आंदोलनात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पिंक महिला रिक्षा चालक संघ, रिक्षा ब्रिगेडसह विविध सामाजिक संघटना सहभागी होणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version