पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ आपल्या आवाजाने गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘सूर आशा’ या कार्यक्रमातून सांगीतिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मोरया थिएटर्स निर्मित, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिंपरी चिंचवड शाखा), पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान, कोहिनूर ग्रुप आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आशा भोसले यांच्या सांगितिक प्रवासाला उजाळा देत मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे, नगरसेविका सीमा सावळे तसेच सारंग कामतेकर, शारदा मुंडे, परिषदेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, लेखिका डॉ. सिमा काळभोर आदी उपस्थित होते.
आशा भोसले यांच्या प्रदीर्घ सांगीतिक वाटचालीचा आढावा ‘सूर आशा’ या कार्यक्रमात घेण्यात आला. प्रशांत साळवी आणि सहकाऱ्यांनी आशादीदींची अजरामर गाणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. या मैफलीत राधिका अत्रे, कोमल कृष्णा, हिम्मत कुमार पंड्या, मानसी भोईर घुले, प्रशांत साळवी आणि भाऊसाहेब भोईर यांनी आशा भोसले यांचे गीत गाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी रसिकांनी भरभरून दाद दिली. राजेश कुमार साकला यांनी ‘आशा भोसले पुरस्कारा’ची पार्श्वभूमी सांगून आपले अनुभव सांगितले.
महापौर रवी लांडगे यांनी भाऊसाहेब भोईर यांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल कौतुक केले. आयोजनात
प्रशांत साळवी, राजेंद्र बंग आणि नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा श्रद्धांजली सोहळा अविस्मरणीय ठरला.
