पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या बेकायदेशीर होर्डिंग्सच्या समस्येकडे नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी गांभीर्याने लक्ष वेधले असून, यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी महानगरपालिकेकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित विभागांना लेखी निवेदन देत संपूर्ण शहरातील होर्डिंग्सचे ऑडिट करण्याची सूचना केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात अनेक ठिकाणी परवानगीशिवाय तसेच नियमांचे उल्लंघन करून जाहिरात फलक उभारले जात आहेत. विशेषतः मुख्य रस्ते, चौक आणि निवासी भागांमध्ये उभारलेले होर्डिंग्स वाहतुकीस अडथळा ठरत असून नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करत आहेत.
नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी आयुक्त, आकाश चिन्ह (Sky Sign) विभाग, तसेच उद्यान विभागाला पत्र पाठवून या सर्व होर्डिंग्सचे सखोल ऑडिट करून नियमबाह्य फलक तात्काळ हटवावेत, अशी ठाम मागणी केली आहे. तसेच संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचाही त्यांनी आग्रह धरला आहे.
दिलेल्या निवेदनात असेही नमूद केले आहे की, काही ठिकाणी संरचनात्मक नियमांचे पालन न करता होर्डिंग्स उभारण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा फलकांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ कारवाई करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या मागणीमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर दबाव वाढला असून, येत्या काळात बेकायदेशीर होर्डिंग्सविरोधात मोहीम राबवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
