Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते अमित राज ठाकरे, अविनाश अभ्यंकर आणि राज्य सरचिटणीस अजय खोपकर यांची पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर अमित ठाकरे यांनी प्रथमच पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शहरातील मनसे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते आणि मनसैनिकांच्या बैठका घेत पक्षबांधणीचा आढावा घेतला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विद्यार्थी सेना, वाहतूक सेना, कर्मचारी सेना, चित्रपट सेना, जनहित व विधी कक्षा तसेच महिला सेनेच्या स्वतंत्र बैठका पार पडल्या. प्रत्येक मनसैनिकाशी ‘वन टू वन’ संवाद साधत पक्ष संघटन, महानगरपालिकेतील कामकाज आणि शहरातील राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

अमित ठाकरे आणि अविनाश अभ्यंकर यांनी तब्बल चार ते पाच तास शेकडो कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संवादातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. आगामी काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी अधिक ताकदीने काम करण्याचा निर्धारही यावेळी मनसैनिकांनी व्यक्त केला.

अमित ठाकरे यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, युवक मोठ्या संख्येने पक्षाशी जोडले जातील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवडकरांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने शहरात येणार असून नागरिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले. दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version