Spread the love

पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असलेल्या ‘भारतीय विद्यापीठ संघाची’ (Association of Indian Universities – AIU) ऐतिहासिक १०० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद यंदा पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

२८ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत होणाऱ्या या परिषदेत देशभरातील विद्यापीठांचे कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. १९२५ मध्ये स्थापन झालेल्या AIU चे हे शताब्दी वर्ष असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या महत्त्वपूर्ण परिषदेचे यजमानपद डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे भूषविणार आहे.

या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता, पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात संपन्न होईल. महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल मा. श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.”

या कार्यक्रमास डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे, भारतीय विद्यापीठ संघाचे अध्यक्ष – मा. प्रा. विनय कुमार पाठक, सरचिटणीस आणि सदस्य सचिव – डॉ. सौ. पंकज मित्तल तसेच डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि अध्यक्षा, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे, डॉ. सोमनाथ पी. पाटील, प्र-कुलपती, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील युनीटेक सोसायटी, पुणे, डॉ. स्मिता जाधव, प्र-कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे, डॉ. यशराज पी. पाटील, विश्वस्त आणि खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे तसेच मा. प्रा. डॉ. एन. जे. पवार, कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे, हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या शताब्दी महोत्सवी परिषदेचा मुख्य विषय “ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला आकार देणे” असा आहे.

या तीन दिवसीय परिषदेमध्ये देशभरातील ४०० हून कुलगुरू उपस्थित राहणार असून एकूण ३४ मान्यवर व्याख्याते विविध समकालीन विषयांवर सखोल विचारमंथन करणार आहेत. यामध्ये स्वदेशी आणि तंत्रज्ञान व आर्थिक राष्ट्रवाद, शाश्वतता व सामाजिक जबाबदारी, उद्योजकता व स्टार्टअप्स, कृत्रिम बुद्धिमत्ता व क्वांटम तंत्रज्ञान, विकसित भारत शिक्षा अधिष्ठान (VBSA) विधेयक, २०२५’, उच्च शिक्षणात आंतरराष्ट्रीयीकरणाला चालना देणे तसेच भारतीय पारंपारिक ज्ञान या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे.

ही परिषद उच्च शिक्षणातील नवकल्पना, संशोधन, परस्पर सहकार्य आणि भविष्यातील धोरणनिर्मिती यांसाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरणार असून, भारताच्या शिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रगत बनविण्यास महत्त्वपूर्ण योगदान देईल.

भारतीय विद्यापीठ संघाच्या (AIU) स्थापना दिन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या व्याख्यानाचा विषय ‘ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनातून आत्मनिर्भर भारताची घडण’ – डॉ विनय सहस्रबुद्धे माजी खासदार, राज्यसभा आणि उपाध्यक्ष रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे मुख्य व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करतील. याच कार्यक्रमात भारतीय विद्यापीठ संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासावर आधारित ‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज: अ सेंचुरी ऑफ इव्होल्यूशन ट्रान्सफॉर्मेशन अँड लीडरशिप’ या पुस्तकाचे प्रकाशन केले जाईल.

या सोहळ्याच्या सांगता समारंभासाठी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील, तर शिक्षण संस्कृती उत्थान न्यासाचे राष्ट्रीय सचिव मा. डॉ. अतुल कोठारी हे सन्माननीय अतिथी असतील.

“भारतीय विद्यापीठ संघाचे (AIU) शताब्दी वर्ष आमच्या विद्यापीठात साजरे केले जात आहे, याचा आम्हाला मनापासून आनंद होत आहे. शिक्षण क्षेत्रातील हा एक ऐतिहासिक टप्पा असून, या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे पूर्णक्षमतेने सज्ज आहे.”

— डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे

“उच्च शिक्षणातील नाविन्यपूर्ण बदल आणि संशोधनाचा जागर या परिषदेच्या माध्यमातून होणार आहे. शताब्दी वर्षातील हे विचारमंथन उद्याच्या प्रगत भारताची पायाभरणी करेल. संशोधनासोबतच शैक्षणिक धोरणांमध्ये सर्वसमावेशक विद्याशाखांना सामावून घेणे हे या परिषदेचे उद्दिष्ट असेल.”

— डॉ. भाग्यश्री पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे

“कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून भारतीय पारंपरिक ज्ञानाचा पाया आणि आधुनिक तंत्रज्ञानाची भरारी; विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी स्टार्टअप्स आणि संशोधनाची नवी पायरी उभारली जात आहे”. – मा. डॉ. सोमनाथ पी. पाटील, प्र-कुलपती, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील युनीटेक सोसायटी, पुणे.

” या ‘विद्येच्या माहेरघरात’ उच्च शिक्षणाच्या धोरणात्मक निर्णयांची नवी दिशा ठरणार आहे. उच्च शिक्षणातील डिजिटल परिवर्तन आणि जागतिक दर्जाची शैक्षणिक गुणवत्ता (Academic Quality) यावर या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, जे पुढील दशकाची दिशा ठरवतील.”

— डॉ. स्मिता जाधव, प्र-कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे

“राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे व्यवस्थापन आणि सेवा सुविधांचे नियोजन आम्ही पूर्ण क्षमतेने केले आहे. वैचारिक आदान-प्रदानातून भविष्याची दिशा निश्चित करणाऱ्या या शैक्षणिक महाकुंभासाठी आम्ही सज्ज असून देशातील सर्व कुलगुरूंचे आणि शिक्षणतज्ज्ञचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

— डॉ. यशराज पाटील, विश्वस्त व खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, सोसायटी, पुणे

” या परिषदेमुळे पुण्याच्या शैक्षणिक वैभवात मानाचा तुरा रोवला जाणार असून, संपूर्ण देशाचे लक्ष या ऐतिहासिक सभेकडे लागले आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी समन्वय आणि आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय शैक्षणिक भविष्यकालीन आव्हाने व संधी या विषयावर या परिषदेत सखोल चर्चा होईल, ज्याचा फायदा भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर होईल.”

— डॉ. एन. जे. पवार, कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version