Spread the love

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडगावातील केशवनगर येथील विद्युत दाहिनी परिसरात सुरू असलेल्या पार्किंग व सुशोभीकरणाच्या कामांची स्थानिक नगरसेवक सुरेश भोईर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गुणवत्तेचा सखोल आढावा घेतला. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना या कामांसंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सुरू असलेल्या कामामध्ये काही त्रुटी आढळून आल्याने त्या तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पाहणीदरम्यान कामाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त करतानाच, उर्वरित काम अधिक दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तसेच परिसर अधिक स्वच्छ व सुशोभित राहावा यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देशही देण्यात आले.

याशिवाय चिंचवडगावातील दशक्रिया घाट परिसरातील पत्रा शेडची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन नगरसेवक भोईर यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. घाटावर विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना सध्या अपुरी व असुविधाजनक बैठक व्यवस्था असल्याने त्यात तातडीने सुधारणा करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पत्रा शेडची त्वरित दुरुस्ती करून सुरक्षित व सोयीस्कर व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या पाहणीवेळी मनपा डेप्युटी इंजिनियर अंधुरे, ज्युनियर इंजिनियर प्रार्थना सोनवणे आणि तानाजी देवकर उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी कामातील त्रुटी दूर करून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन नगरसेवक सुरेश भोईर यांना दिले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version