Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील आशा सेविकांचे गेल्या सहा महिन्यांपासून मानधन थकले असल्याचा गंभीर मुद्दा पुढे आला असून, त्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन तातडीने वेतन अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी विशाल बाळासाहेब काळभोर यांनी यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, आशा सेविका आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा कणा असून, त्यांनी कोविडसह विविध आरोग्य मोहिमांमध्ये सातत्याने काम केले आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचे मानधन थकले असल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेक सेविकांना दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले असून, यामुळे त्यांच्या कामावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
“काम थांबले नाही – काम थांबणार नाही, पण वेतन मात्र थांबले आहे,” अशी भावना आशा सेविकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, थकीत सहा महिन्यांचे मानधन तात्काळ वितरित करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

विशाल काळभोर यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, आशा सेविकांचे प्रश्न केवळ आर्थिक नसून त्यांच्या सन्मानाशीही संबंधित आहेत. त्यामुळे महापालिकेने याकडे तातडीने लक्ष देत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने त्वरित पावले उचलून आशा सेविकांना दिलासा देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version