पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- राज्य सरकारने रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वातावरण तापले असून, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी या निर्णयाचे जोरदार समर्थन करत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मराठीला विरोध करणाऱ्यांनी महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.
राज्य सरकारने १ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ४ मे रोजी काही संघटनांनी पुकारलेल्या संपावरही कांबळे यांनी टीकास्त्र सोडले. हा संप पूर्णपणे अपयशी ठरेल, असा दावा करत त्यांनी रिक्षा चालकांनी अशा आंदोलनांपासून दूर राहावे, असे आवाहन केले.
‘मराठी ही अस्मितेची ओळख’
मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून राज्याची अस्मिता आणि संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांच्या भूमीत मराठीला विरोध करणे सहन केले जाणार नाही, असे ठाम मत कांबळे यांनी व्यक्त केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा वारसा जपण्यासाठी मराठी सक्ती आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
बोगस परमिट घोटाळ्याचा मुद्दा ऐरणीवर
यावेळी कांबळे यांनी रिक्षा परवान्यांमधील कथित गैरव्यवहाराचाही मुद्दा उपस्थित केला. मुंबई आणि पिंपरी-चिंचवडसह विविध भागांत बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात ‘बोगस परमिट’ मिळवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत मराठी सक्तीमुळे अशा गैरप्रकारांना आळा बसेल, असा दावा त्यांनी केला.
४ मेच्या संपाला विरोध
मराठीला विरोध करणाऱ्या ४ मेच्या संपात महाराष्ट्र रिक्षा पंचायत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करत, राज्यातील रिक्षा चालकांनी या आंदोलनाला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन करण्यात आले. ‘ऑटो टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती’नेही संपाला पाठिंबा न देण्याची भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.
निर्णायक बैठकीचे आयोजन
या सर्व पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ‘महाराष्ट्र रिक्षा पंचायत’ आणि ‘रिक्षा ब्रिगेड’ यांच्या वतीने आज (२३ एप्रिल) मोई, कुदळवाडी-चिखली परिसरातील पंढरी मंगल कार्यालय येथे सायंकाळी ७ वाजता भव्य बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला संतोष नाना गुंड, अनिल शिरसाट, शुभम तांदळे, जालिंदर भाऊ गवारे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मराठी अस्मिता आणि रिक्षा चालकांच्या हक्कांसाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.
