पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पुणे महानगरपालिकेच्या ज्युनियर इंजिनिअर (JE) पदाच्या १६९ जागांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना दिलेल्या परीक्षा केंद्रांबाबत नाराजी वाढली आहे. मराठा सेवा संघच्या वतीने दि. २० एप्रिल २०२६ रोजी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवेदन देत परीक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, २२, २३ आणि २९ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेसाठी पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील उमेदवारांना नागपूर, अमरावती, नांदेड यांसारखी ५०० ते ९०० किलोमीटर अंतरावरील केंद्रे देण्यात आली आहेत. यामुळे उमेदवारांना प्रवासासाठी किमान दोन दिवस द्यावे लागत असून राहण्याची व जेवणाची अतिरिक्त सोय करावी लागत आहे.
सध्या राज्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू असताना इतक्या दूरच्या ठिकाणी परीक्षा केंद्रे देणे हे उमेदवारांसाठी अन्यायकारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. विशेषतः बहुतेक उमेदवार हे गरीब व शेतकरी कुटुंबातील असून, त्यांना ५ ते १० हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च परवडणारा नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उमेदवार परीक्षेला गैरहजर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर, परीक्षा पुण्यातच घेण्यासाठी कालावधी वाढवावा किंवा किमान स्थानिक उमेदवारांसाठी पुणे जिल्ह्यातच केंद्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, जर परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार झालीच, तर गैरसोयीमुळे अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना पुढील १० ते १५ दिवसांत पुण्यातच पुन्हा संधी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात खासदारांनी वैयक्तिक लक्ष घालून महापालिका प्रशासनाला योग्य निर्देश द्यावेत, जेणेकरून गरीब व होतकरू उमेदवारांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
