Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा प्रश्न अखेर सुटणार की पुन्हा पुढे ढकलला जाणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी भाजपकडून नावे निश्चित करण्यात होत असलेल्या विलंबामुळे हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. मात्र, येत्या सोमवारी (२० एप्रिल) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पक्षांतर्गत मतभेदांमुळे स्वीकृत नगरसेवकांची निवड रखडली होती. जुने-नवे कार्यकर्ते, आमदार समर्थक आणि निष्ठावंत गट यांच्यातील समतोल साधताना भाजप नेतृत्वाला मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे अनेक दिवस या प्रक्रियेला विलंब झाला.

दरम्यान, पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची नावे आधीच जाहीर झाली असताना पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र निर्णय लांबला होता. शहरातील विविध गटांकडून आपापल्या समर्थकांची नावे पुढे करण्यात आली होती. त्यात आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या गटांचा समावेश आहे. प्रत्येक गटाने आपला प्रभाव टिकवण्यासाठी प्रयत्न केल्याने एकमत होण्यास विलंब झाला.

सात जागांसाठी तब्बल दोनशेहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याने निवड प्रक्रिया अधिकच गुंतागुंतीची झाली. अखेर हा निर्णय प्रदेश नेतृत्वावर सोपविण्यात आला. पाठविण्यात आलेल्या नावांमधून सात जणांची निवड निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आता सर्वसाधारण सभेत ही नावे जाहीर होणार का, की पुन्हा काही कारणास्तव निर्णय पुढे ढकलला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version