Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २८ अंतर्गत येणाऱ्या पिंपळे सौदागर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नवीन पर्यायी रस्त्याचा समावेश करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत नगरसेविका  अनिता संदीप काटे यांनी महापालिकेच्या नगररचना विभागाच्या उपसंचालकांकडे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नाशिक फाटा ते कोकणे चौक बीआरटीएस मार्ग तसेच कुणाल आयकॉन समोरील डी.पी. रस्ता हे दोन प्रमुख मार्ग कोकणे चौक आणि शिवर चौक येथे एकत्र येत असल्याने या भागात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. परिणामी स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत असून, वारंवार तक्रारीही समोर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर पिके चौक ते कुंजीर चौक दरम्यान संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या जगताप डेअरी बीआरटीएस रोडजवळ ‘वाय’ जंक्शन स्वरूपात नवीन रस्ता प्रस्तावित करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा रस्ता विकसित झाल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन सध्याच्या वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, या महत्त्वाच्या प्रस्तावाचा समावेश नवीन विकास आराखड्यात (डीपी) करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका  अनिता संदीप काटे यांच्यासह नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका कुंदा भिसे यांनी केली आहे. या मागणीमुळे पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version