पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिक संघामध्ये विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संघाच्या सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत बाबासाहेबांना अभिवादन केले.
यावेळी संघाच्या सदस्या राधिका बोर्लीकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याबद्दल आपले विचार मांडले. त्यांनी बाबासाहेबांनी समाजातील वंचित घटकांसाठी केलेला संघर्ष, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक समतेसाठी दिलेले योगदान यावर सविस्तर भाष्य केले.
तसेच त्यांनी महाड चवदार तळे सत्याग्रह या ऐतिहासिक आंदोलनाचा उल्लेख करत बाबासाहेबांच्या कार्याची प्रेरणा आजही समाजाला मार्गदर्शक ठरत असल्याचे सांगितले. बाबासाहेबांमुळेच आज भारतीय समाजाला समानतेचा आणि न्यायाचा मार्ग मिळाला असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमात ज्येष्ठ सदस्य श्री रघुनाथ नष्टे यांनी बाबासाहेबांची भूमिका साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला वेगळेच आकर्षण लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी नरेंद्र मिसाळ यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानले. बाबासाहेबांविषयी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
