महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित समाजव्यवस्थेचा परिसंवादातून उहापोह
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांचा विचार समाजात रुजविण्यासाठी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी आयुष्यभर कार्य केले. स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणे, जातिभेद व अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणे आणि वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे या त्यांच्या कार्यातून समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा पाया घातला.
महात्मा फु्ले यांचे विचार आजही समाजाच्या विकासासाठी मार्गदर्शक असल्याचे मत ‘महात्मा फुले यांना अभिप्रेत समाजव्यवस्था’ या विषयावर आयोजित तज्ज्ञांच्या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताह व विचार प्रबोधन पर्व २०२६ अंतर्गत ‘महात्मा फुले यांना अभिप्रेत समाजव्यवस्था’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, अनुसूचित जाती जमाती आयोग, महाराष्ट्र राज्याचे सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे, अॅड. मनीषा महाजन, संविधान अभ्यासक नुरखा पठाण तसेच सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथील अॅड. दिशा वाडेकर यांनी सहभाग घेतला.
यावेळी शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुजाता बोराटे, अर्चना सस्ते, नगरसदस्य कुणाल वाव्हळकर, बाबा त्रिभुवन, माजी नगरसदस्य मारुती भापकर तसेच उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणाले, “महात्मा फुले यांनी समाजात समता आणि शिक्षणाचा जो दीप प्रज्वलित केला, तो आजही मार्गदर्शक ठरत आहे. फुले यांच्या विचारांचा प्रसार करून समाज अधिक संवेदनशील आणि जागरूक बनविणे गरजेचे असून यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे.’
अॅड. गोरक्ष लोखंडे म्हणाले, ‘महात्मा फुले यांच्या विचारांप्रमाणे शिक्षण, जागरूकता आणि संघटित प्रयत्नांमधूनच सामाजिक परिवर्तन साध्य होऊ शकते. महिलांना शिक्षण आणि संधी उपलब्ध करून दिल्यास समाज अधिक सक्षम होईल. तसेच सामाजिक विषमता दूर करण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे.’
अॅड. मनीषा महाजन म्हणाल्या, ‘महात्मा फुले यांनी मांडलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची आज अधिक गरज आहे. अंधश्रद्धा, चुकीच्या समजुती आणि परंपरांच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विचारप्रबोधन घडवून समाज अधिक जागरूक आणि सक्षम बनविता येतो.’
नुरखा पठाण म्हणाले, ‘महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घेत असताना समता, बंधुता आणि न्याय या तत्वांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे.’
अॅड. दिशा वाडेकर म्हणाल्या, ‘महात्मा फुले यांच्या विचारांनुसार समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जोपासना करताना महिलांचे प्रश्न आणि वंचित घटकांच्या हक्कांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या अधिकारांसोबत कर्तव्यांचीही जाणीव ठेवली पाहिजे.’कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले.
क्रांतिसूर्याला सलाम या गीतगायनातूनआणि ‘जोतिबांची सावली…सावित्री माऊली’ नाटकातून इतिहासाचा जागर*
सामाजिक समता सप्ताह व विचार प्रबोधन पर्व २०२६ मध्ये पहिल्या दिवशी (११ एप्रिल) सायंकाळच्या सत्रात ‘क्रांतिसूर्याला सलाम’ या प्रबोधनात्मक गीतगायन कार्यक्रमात कव्वाल फैजान ताज यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा सुरेल आविष्कार घडविला. सामाजिक समता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत उपस्थितांची दाद मिळवली. तसेच तेजांकुर बहुउद्देशीय संस्था, अमरावती प्रस्तुत दोन अंकी ऐतिहासिक नाटक ‘जोतिबांची सावली…सावित्री माऊली…’ याचेही प्रभावी सादरीकरण करण्यात आले. अपूर्वा सोनार आणि सहकाऱ्यांनी साकारलेल्या या नाटकातून महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा, संघर्षाचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासाचा जिवंत पट उलगडण्यात आला. नाटकातील प्रभावी संवाद, सशक्त अभिनय आणि आशयपूर्ण मांडणीमुळे प्रेक्षक भावूक झाले. या दोन्ही कार्यक्रमांमधून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर होऊन समाजात प्रबोधनाचा संदेश पोहोचला, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
